Bookstruck

भारतीय संस्कृती 100

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पत्नी ज्वारीची भाकरी भाजून देते, पती कोणती विचाराची भाकरी तिला देतो? परंतु पतीच्या डोक्यात हा विचार येतच नाही. माझ्या पत्नीला मन आहे, बुध्दी आहे, हृदय आहे, अशी पतीला जाणीव नसते. त्यामुळे जगातील घडामोडी तो घरात बोलणार नाही. मग मुलाबाळांनाही काय कळणार?  पत्नीचे जेथे विचारांच्या अज्ञानात, तेथे मुलेही अज्ञानातच वाढणार.

भारतीय संस्कृतीतील गृहस्थाश्रम असा नाही. ज्या ब्राह्मणावर बकासुराकडे जावयाची पाळी आली, त्याच्या कुटुंबातील प्रत्येक घटक मरावयास तयार होतो. पती म्हणतो मला मरू दे. पत्नी म्हणते मला मरू दे. मुलगी म्हणते मला मरू दे. मुलगा म्हणतो मला मरू दे. याला म्हणतात गृहस्थाश्रम. याला म्हणतात कुटुंब. एका विचाराने सारे प्रेरित आहेत. एका ध्येयाची पूजा होत आहे.

गृहस्थाश्रम म्हणजे संयमाची शाळा. गृहस्थाश्रम म्हणजे तपश्चर्या आहे. आपण आपल्या शेकडो वृत्तींना लगाम घालावयास गृहस्थाश्रमात शिकतो. मुले आजारी पडली. त्यांची शुश्रूषा करावी लागते. मुलाच्या लहरी सांभाळाव्या लागतात. पदोपदी रागावून थोडेच भागणार आहे?

गृहस्थाश्रमात आपण त्यागाचे धडे घेतो. पती पत्नीला सारे देऊ पाहतो. पत्नी पतीला सुखवू पाहते. आईबाप फाटके कपडे घालून आधी मुलांना नटवतात.  दुस-यांचे सुख पाहणे, दुस-याच्या आनंदात आनंद मानणे हे गृहस्थाश्रमाचे शिक्षण आहे.

अर्धनारीनटेश्वर हे माणसाचे ध्येय आहे. पुरुष कठोर असतो. स्त्री मृदू असते पुरुषाने पत्नीपासून मृदूता शिकावयाची. स्त्रीने पतीपासून कठोर व्हावयास शिकावयाचे. प्रसंगी मेणाहून मऊ व वज्राहून कठोर होता आले पाहिजे. केवळ पुरुष अपूर्ण आहे, केवळ स्त्री अपूर्ण आहे. दोघांच्या गुणांच्या मीलनात पूर्णता आहे. गृहस्थाश्रम म्हणजे पति-पत्नींनी पूर्ण होण्याची शाळा;  सर्वांगीण विकास करुन घेण्याचे स्थान;  हृदयाचे व बुध्दीचे गुण शिकण्याची जागा. उत्कृष्ट मुले तयार करुन समाजाला देणे हे महत्वाचे काम आईबापांस करावयाचे असते. परंतु मुले चांगली व्हावीत म्हणून स्वत: चांगले राहिले पाहिजे. उच्चाराने, विचाराने, आचाराने, चांगले राहावयाचे. आपली मुले चांगली व्हावीत. असे मानणा-या आईबापांनी अत्यंत जागरूकतेने वागले पाहिजे. प्रेम, कर्तव्य सहकार्य दिसली पाहिजेत, आईबापांची भांडणेच जर मुले रोज पाहतील, तर त्यांच्या जीवनावर किती अनिष्ट परिणाम होईल! आळशी व विलासी आईबाप जर समोर असतील तर मुलेही पोशाखीच होतील.

आपली मुले शरीराने बळकट, हृदयाने विशुध्द व उदार, बुध्दीने विशाल व निर्मळ होतील असे आईबापांनी पाहिले पाहिजे. ज्या काळात आपण राहतो त्या काळाची कल्पना मुलाबाळांस दिली पाहिजे. जेवताना, हसता-खेळताना मुलांना इतिहासाचे हे सारे ज्ञान दिले पाहिजे. विसाव्या शतकातील मुलांची मने ''मांजर आडवे गेले तर काम फसेल. '' अशा कल्पनांनी भरून जाणार नाहीत असे केले पाहिजे. माझे एक मित्र आहेत. ते म्हणाले, ''माझ्या मुलांबाळांच्या देखत असे जर कोणी बोलला तर मला चीड येते. आमच्या मनावर लहानपणी हे संस्कार झाले, परंतु आमच्या मुलांच्या मनावर तरी असले बावळट संस्कार नकोत व्हायला. '' मुलांच्या मनाबद्दल किती ही काळजी!

« PreviousChapter ListNext »