Bookstruck

भारतीय संस्कृती 103

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ज्याप्रमाणे वर्णधर्मांची सेवा महात्माजी करीत आहेत. त्याचप्रमाणे आश्रमधर्मालाही उजळा ते देत आहेत. स्वत:च्या जीवनात गेली तीस-पस्तीस वर्षे पूर्ण ब्रह्मचर्य पाळून त्यांनी कामावर विजय मिळावला आहे. ब्रह्मचर्याची महती ते शतदा सांगत असतात. राष्ट्रात ब्रह्मचर्याचा माहिमा त्यांनी वाढविला आहे. ब्रह्मचर्य कसे शक्य होईल यासंबंधी अनुभवाच्या व व्यावहारिक अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ब्रह्मचर्याप्रमाणेच गृहस्थाश्रमासही ते उज्ज्वल करीत आहेत. वधूवरांस उज्ज्वल पथदर्शन ते करीत आहेत. पतिपत्नींची ध्येये काय, याविषयी त्यांनी लिहिले आहे.

वानप्रस्थ व संन्यास ते स्वत:च्या उदाहरणाने शिकवीत आहेत. महात्माजींहून आज थोर संन्यासी कोण आहे? आंध्र प्रांतात एक भक्त महात्माजींस त्यांची स्वत:च्या हाताने तयार केलेली एक तसबीर अर्पण करीत होता. महात्माजी म्हणाले, ''हि तसबीर मी कोठे लावू?  माझी खोली तरी कोठे आहे?  आता हा देह अजून उरला आहे. या देहाचेही ओझे आता कमी झाले तर बरे''!

महात्माजींच्या उदाहरणाने आज भारतवर्षात शेकडो कार्यकर्तें वानप्रस्थ होऊन निरनिराळी कार्मे करीत आहेत. संन्यास हा शब्द न उच्चारणेच बरे. परंतु महात्माजींनी वानप्रस्थ निर्माण केले आहेत. ब्रह्मचर्य व आदर्श गृहस्थाश्रम यांसाठी रात्रंदिवस धडपडणारे मुमुक्षू निर्माण केले आहेत.

शेकडो विचारप्रचारक निर्मून महात्माजींनी खरे ब्राह्मण निर्माण केले आहेत. राष्ट्रासाठी मरण्याची वृत्ती निर्माण करून त्यांनी क्षत्रिय निर्माण केले आहेत. राष्ट्रातील लाखो खेड्यांतील लोकांना घास देण्याची व्यवस्था करतील, असे खरे वैश्य ते निर्माण करीत आहेत. राष्ट्रातील घाण दूर करतील, स्वत: झाडतील, विष्ठा उचलतील, नवीन शौचकूपपद्धती शिकवितील, असे खरे शूद्र ते निर्माण करीत आहेत. ज्याला वर्णाश्रमधर्माची आन्तरिक तळमळ असेल, तो या महापुरूषाच्या चरणांशी जाऊन वर्णाश्रमधर्माच्या सेवेला वाहून घेईल.

शुद्ध वर्णाश्रमधर्माची महात्माजी मूर्ती आहेत. त्या धर्माचे सच्चे उपासक ते आहेत. भारतीय संस्कृतीत हे वर्णाश्रमधर्माचे थोर तत्व ते वाढवीत आहेत. जीवनात वर्णाश्रमधर्म सत्यार्थाने यावेत म्हणून ते अहर्निश खटपट करीत आहेत. ते भारतीय संस्कृतीच्या थोर उपासका! तुझ्यामुळे भारताचे मुख उजळ होत आहे, भारतीय संस्कृतीचे सत्स्वरूप जगाला कळत आहे. भारतीयांवर तुझे अनंत उपकार!

« PreviousChapter ListNext »