Bookstruck

भारतीय संस्कृती 121

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मांस खा, पण निदान नरमांस तरी खाऊ नका, असे हे पहिले अहिंसेचे आचार्य आपल्या समाजास सांगू लागले. नरमांस भक्षावयाचे नाही अशा आणाशपथा लोक घेऊ लागले. परंतु ज्यांना ही चटक होती, त्यांना हे पाहवेना. नवीन व्रते घेणा-यांना ते मुद्दाम नरमांस फसवून खावयास घालीत. वसिष्ठ ऋषी व कल्माषपाद राजा यांची अशीच गोष्ट आहे. वसिष्ठादी काही ऋषींना तेथे मुद्दाम फसवून नरमांस वाढण्यात आले. मागून ही गोष्ट कळल्यावर वसिष्ठाने त्या राजास शाप दिला.

वसिष्ठ नरमांस खाणारा आहे, उगीच बढाया मारतो, असेही काही म्हणत. नवव्रत घेणा-या वसिष्ठांस अर्थात याचे वाईट वाटे. खादी वापरण्याचे व्रत असणा-या व्यक्तीस जर कोणी म्हटले, ‘अहो, तुम्ही चोरून विलायती वापरता, माहीत आहे !” तर त्याला कसे वाटेल बरे ? वसिष्ठांची अशीच तगमग होत असेल. ऋग्वेदात एके ठिकाणी वसिष्ठ म्हणतात,

“अद्य मुरीय यदि यातुधानोऽस्मि”

“मी जर यातुधान असेन, तर या क्षणी माझे प्राण जावोत.” यातुधान म्हणजे राक्षस. यातुधान म्हणजे विशेषतः नरमांस भक्षण करणारे राक्षस, असाच अर्थ असावा.

अशा रीतीने समाजाचा छळ सोसून मानवाला विकासाकडे वसिष्ठादी विचारवंत नेत होते. नरमेध बंद पडले. हळूहळू नरमांसभक्षणही बंद झाले. परंतु मांसाशन थोडेच सुटले होते ? पशुमांसभक्षणही सुरु होतेच. वाटेल त्या पशूंचे मांस खात असत. परंतु त्यातही चवी असतातच. गायीचाही त्या वेळेस वध होत असे. गोमांस खाण्यात येत असे. परंतु ऋग्वेदातच गायीचा वध करू नका, गायीचा महान महिमा ओळखा, असे सांगणारे महर्षी दिसतात. गायीच्या महिम्याच्या सुंदर ऋचा ऋग्वेदातच कुठे कुठे आहेत.

माता रुद्राणां दुहिता वसूनां। स्वसाऽऽदित्यांना अमृतस्य नाभिः।।

“अरे, ही गाय रुद्रदेवांची माता आहे ; वसुदेवाची दुहिता आहे ; ही आदित्याची बहीण आहे ; ही अमृताची झरी आहे.” असे दिव्य, भव्य वर्णन प्रतिभावान ऋषी करीत आहे. त्याच सूक्तात ‘निरपराधी गायीला वधू नका’ असा स्पष्ट आदेश ऋषी देत आहे.

वेदातच गाय वाचविण्याचे जरी प्रयत्न दिसले तरी गाय म्हणताच गोपालकृष्ण डोळ्यांसमोर उभा राहतो. गायीची खरी थोरवी भगवान श्रीकृष्णांनीच भारतवासीयांस पटविली. या कृषिप्रधान देशाला गायी मारुन कसे चालेल ? गाय दूधही देते व शेतीला बैलही देते, अशा रीतीने दुहेरी फायदा आहे. नर व मादी करावयाचे ते समजत नाही. कोंबडी मारणार नाहीत, परंतु कोंबड्याचे काय करावयाचे ? उत्पत्तीसाठी एक कोंबडा पुरे. बकरी मारणार नाहीत, परंतु कोंबड्याचे काय करावयाचे ? शेळी मारणार नाहीत, परंतु बोकडाचे काय करावयाचे ? म्हैस पाळतील, परंतु रेड्याचे काय करावयाचे ?

« PreviousChapter ListNext »