Bookstruck

भारतीय संस्कृती 142

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ध्येयांची पराकाष्ठा

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणा-या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास भारतीय संतांचा इतिहास, भारतीय वीरांचा इतिहास.

सत्यासाठी रामचंद्र वनात गेला. पित्याचा शब्द खोटा पडू नये, यासाठी तो बारा वर्षे रानावनांत राहावयास आनंदाने सिध्द झाला, आणि बारा वर्षानंतर पुन्हा जेव्हा अयोध्येचे राज्यपद त्याला मिळाले, त्या वेळचे त्याचे वर्तन किती उदात्त ! भगवती सीतादेवीच्या पावित्र्याविषयी प्रजेच्या मनात शंका आहे, असे कळताच तो थोर प्रभू गर्भवती सीतेचा त्याग करतो. प्रजेच्या समोर धुतल्या तांदळासारखी दानत हवी. इवलीही संशयाला जागा देता कामा नये. एखादा वात्रट मनुष्य काही तरी बोलला, त्याचा रामाने एवढा बाऊ करावयाला नको होता, असे आपण म्हणू. परंतु रामासमोर भिन्न आदर्श होता. राम सर्व प्रजेचे पुंजीभूत पावित्र्याचे प्रतीक होता. प्रजेला पवित्र ठेवू पाहणारा राजा स्वत: संशयातीत हवा. प्रजेचे पापपुण्य राम स्वत:कडे घेत होता. काही तरी आपलेच चुकले असे त्याला वाटे.

भारतीय संस्कृतीत त्याग व पावित्र्य या दोन गुणांना अत्यंत मोठे स्थान आहे. भारतीय मनुष्य केवळ पैशाला, केवळ सत्तेला मान देत नाही. त्या गुणाबरोबर त्याग व पावित्र्य हवे. दरिद्री शुक्राचार्याला भारतीय जनता देवाप्रमाणे मानील. भारतीय जनतेने राजांच्या पालख्या कधी उचलल्या नाहीत. परंतु संतांच्या पालख्या दरवर्षी लाखो लोक घेऊन जातात. जनक केवळ राजा होता म्हणून नव्हे, तर ज्ञानी असून विरक्त होता म्हणून तो प्रात:स्मरणीय. त्यागाशिवाय ज्ञान नाही. आसक्ताला ज्ञान कोठून असणार ? ज्ञान म्हणजे अद्वैतज्ञान. ज्ञान म्हणजे अद्वैताची अनुभूती. ही अद्वैताची अनुभूती जसजशी अधिकाधिक जीवनात येते, तसतसा अधिकाधिक त्याग होऊ लागतो. म्हणून त्याग हे अद्वैताचे लक्षण भारतीय संस्कृती मानते.

अशा त्यागाबरोबर पावित्र्यही येतेच. जो त्याग अद्वैताच्या अनुभूतीतून होतो तो पावित्र्य बरोबर आणल्याशिवाय राहात नाही. भारतात स्त्री-पुरुष-विषयक संबंध कसे आहेत, इकडे सर्वांचे डोळे असतात. हे कामपावित्र्य आधी पाहिले जाते. तुमच्याजवळ इतर शेकडो गुण असून हा कामपावित्र्याचा महनीय गुण नसेल, तर जनता तुम्हाला मानणार नाही. जनतेच्या हृदयाचे स्वामी तुम्ही होणार नाही.

लोकमान्य, महात्माजी, यांच्याविषयीच्या अलोट भक्तीचे कारण त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात व अपरंपार त्यागात आहे. भारतीय जनता हे काम पावित्र्याचे थर्मामीटर सर्वांस लावून बघते. त्यागाचे थर्मामीटर सर्वांस लावून बघते. या दोन्ही कसोट्यांत जो उतरला, त्याचे वेड तिला लागते. त्या महापुरुषाला डोक्यावर घेऊन ती नाचेल.

« PreviousChapter ListNext »