Bookstruck

सुंदर पत्रे 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एखादे वेळेस मनात येते की, सारे सोडावे. लहानशी बाग करावी, फुले फुलवावीत. एखादी गाय असावी. तिचे बागडणारे वासरू असावे. बसावे नदीकाठी वडाखाली. वाजवावी बासरी! निष्पाप, सरळ सुंदर जीवन! पण मनातील हे विचार मनातच राहतात, व संघर्षमय जीवन-टीका प्रतिटीकांचे जीवन ओढून नेते. परंतु हे संघर्ष तरी कशासाठी? जीवनाची बाग फुलावी म्हणूनच ना? विषमता, दारिद्य, अन्याय, द्वेष-मत्सर जावे म्हणूनच ना? हे संघर्षही उच्च पातळीवरून चालवले म्हणजे झाले. जनतेला सुसंवादी तत्त्वज्ञान देणे, नव-उदार श्रध्दा देणे, अशी आपली निष्ठा असली म्हणजे पुरे. खरे की नाही?

तुम्ही येणार ना लग्नाला, इंदूच्या नि राजाच्या? अंतूभाऊंच्याही मालतीचे व चंदूचे लग्न पुण्यास आहे. ती दोन्ही लग्नेही २५ व २६ तारखेलाच. जायचे तरी कुठे कुठे! मनात सर्वांसाठी प्रार्थना करीन म्हणजे झाले. पुरे ना आता हे पत्र? अग, मी केव्हाचे लिहीत आहे. तुझ्या वाढदिवसाची तारीख का अठरा होती? तू येशील तेव्हा परीक्षेत पास होण्याबद्दल, तसेच वाढदिवसाबद्दल तुला जे काय हवे असेल ते देईन हो बाळ. प्रिय अरुणा, 'मुंबईला जायचे, भगभग गाडीने जायचे'  असे म्हणून नाचत असेल. मुलांना बाहेर हिंडणे, दूर जाणे, याहून दुसरे प्रिय काय आहे? परंतु आईही जवळच हवी. तिच्या आधारावर बाकीच्या उड्या.

मी आलो तर अरुणाला घेऊन आपण हँगिंग गार्डनवर जाऊ. तेथील फुलांची रंगीबेरंगी सृष्टी पाहून ती नाचत सुटेल. 'ओहो, ओहो- सुंदर' असे टाळ्या वाजवीत ती म्हणेल. तिला गोड पापा. अप्पा नि ताईस स. प्र.

तुझा
अण्णा

साधना, २५ फेब्रुवारी १९५०

« PreviousChapter ListNext »