Bookstruck

सुंदर पत्रे 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असा हा आपला भारतीय वारसा आहे. शत्रू सतावीत आहेत. आपणासही पशू करण्याची त्यांची कोशीस आहे. आम्ही पशू झालो परंतु अजून ते कसे होत नाहीत असे त्या शत्रूंच्या मनांत जाचत आहे. आपण पशू न होता पशुपतीच राहिले पाहिजे. हलाहल पिऊन शिवशंकर झाले पाहिजे. महात्माजींचे ते बलिदान व्यर्थ न जावो. ते भारतास सांभाळो, सत्त्वच्युत होऊ न देवो.

ईश्वराच्या दृष्टीने सारी मानवजात, एवढेच नव्हे तर सारे विश्व एक आहे. आपण एकाच बोटीत सारे बसलेले आहोत. दुसरा कोणी भोक पाडू लागला तर का आपणही पाडायचे? तसे करू तर बोट लौकरच बुडेल. आपण मारक न होता तारक व्हावे.

सुधा, माझ्या मनात असे विचार येत असतात, ते कोणाला सांगू? सेवादलास मधून मधून सांगत असतो. परंतु माझ्याजवळ तरी ते राहोत.

ती. सौ. अक्का भेटली होती. ती खूपच ग अशक्त दिसली. खरे म्हणजे तिला हवी विश्रांती, परंतु विश्रांती कशी मिळायची? ती महिनाभर तुमच्याकडे येणार आहे. तेवढीच प्रकृती सुधारेल. त्यातल्या त्यात होईल ते करायचे.

तू बडोद्यास न जाता बोर्डीसच राहणार आहेस हे ऐकून बरे वाटले. ज्या शाळेत इतकी वर्षे शिकलीस तेथूनच शेवटची परीक्षा पास हो. पुन्हा तेथील हवापाणी, तो सुंदर समुद्र, त्या नारळी तुला अन्यत्र कोठे मिळणार? इंग्रजीचा थोडा अधिक अभ्यास कर. संस्कृत वाचीत जा. शे-दोनशे सुभाषिते पाठ कर. म्हणजे खूप उपयोग होईल. पास तर तू पहिल्याच वर्षी होशील यात शंका नाही. आनंदाने सारी असा.

ओले काजूचे गर, कोणी येणारा जाणारा भेटला तर पाठवीन. हे गर काढणे कौशल्याचे असते. काजूच्या फळाच्या पुढे ती बी असते. कच्ची असताना ती तोडायची. दगडावर जरा घासायची. मग काडीने आतील गर काढायचा. हातांना तेल लागते, ते एखादे वेळेस उभारतेही. हे ओले गर आमटीत, अळवाच्या भाजीत छान लागतात. पिकलेले काजूही आता मिळतात. मीठ लावून खायचे. एखादा काजू रसाळ असतो. एखाद्याची खवखव लागते.

परवा आजोळच्या परसवात गेलो होतो. मी एकटाच त्या विहिरीवर गेलो होतो. किती तरी आठवणी आल्या. तो काळांबा गंभीरपणे उभा होता. त्याच्यावर खूप आंबे आले आहेत. याचेच आंबे काढताना शेजारचे गोविंद भटजी पडले होते. त्यांचा पाय त्यामुळे कायमचा अधू झाला होता. एकेक झाड परंतु ते माझ्याजवळ बोलत होते. ती झाडे तेथे होती. परंतु ती माणसे कोठे आहेत?

« PreviousChapter ListNext »