Bookstruck

सुंदर पत्रे 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

क्षणभरी जरि देह न सूटता । तटतटा स्थळिचे स्थळि तूटता ॥

असे हृद्य वर्णन आहे. आणि सीता रामाबरोबर वनात जायला निघते :

जानकी जनकराजकुमारी । पाय कोमल जिचे सुकुमारी ।
चालली जशि वना अनवाणी । बोलली कटकटा जनवाणी ॥

असे भावसुंदर, शब्दसुंदर श्लोक वामनांनीच लिहावे. आणि राशाचे वर्णन ऐक :

दूर्वादलश्यामल दीप्ति देही । शोभे सवे लक्ष्मण जो विदेही ॥

रामरक्षेतील  ''रामं दूर्वादलश्यामं'' हा श्लोक का वामनांना आठवला ? पावसाळ्यातील दूर्वांचा रंग कसा निळसर-काळसर हिरवट असतो, तशी रामाची कांती होती.

आणि गुह कोळी येथे निजले होते म्हणून सांगतो. भरत त्या पवित्र धुळीत लोळतो. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात :-

तनुवरी गुढियाच उभारती । कविमुखे किति वर्णिल भारती ॥

कवीच्या मुखाने वाग्देवता त्या सहृदय प्रसंगाचे किती वर्णन करणार ?

आणि वामनाख्यानातील बटु वामनाचे पुढील वर्णन ऐक :-

करि कमंडलु दंड मृगाजिन

एका चरणाने चित्र उभे केले. बळीजवळ वामन तीनच पावले जमीन मागतो. बळी देतो. आणि वामन एका पावलाने पृथ्वी व्यापितो. दुस-या पावलाने आकाश व्यापतो. तिसरे पाऊल कुठे ठेवायचे ? राजाची फजीती होणार म्हणून देव दुंदुभी वाजवू लागतात. बळी म्हणतो :

''मी देवाच्या या घोषाला भीत नाही. परंतु प्रतिज्ञा पाळता आली नाही या अपकीर्तीला मी भितो. माझ्या मस्तकावर तिसरं पाऊल ठेव-''

न भी सुरांच्या जयघोष- नादा । भीतो जसा मी अपकीर्तिवादा ॥

असे उदात्त शब्द बळी बोलतो. मृच्छकटिकातील चारुदत्ताची आठवण होते. तो म्हणतो :-

न भीतो मरणादस्मि केवलं दूषितं यश: ।
विशुध्दस्य हि मे मृत्यु: पुत्रजन्मसम: किल ॥

''मरणाचं मला भय नाही. यशाला कलंक लागेल म्हणून भीती वाटते. विशुध्दपाणी आलेला मृत्यू, मला पुत्रजन्मासमान आहे.'' सुधा, अशी ही भारतीय परंपरा. काही झाले तरी तत्त्वच्युत होऊ नका असे भारतीय इतिहास शेकडो शतकांतून गर्जून सांगत आहे.

« PreviousChapter ListNext »