Bookstruck

सुंदर पत्रे 42

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मी पुन्हा बाहेर निजू लागलो. रात्री आकाशातील गंमत बघतो. ढग येतात आकाशात. परंतु ते दाट नसतात. झिरझिरीत असतात. आपण अंगावर अर्धवट पातळसे पांघरूण घ्यावे, त्याप्रमाणे आकाशातील तारका क्षणभर ढगांचे झिरझिरीत पांघरुण अंगावर घेतात; तर दुस-याच क्षणी फेकून देतात व हसू लागतात. सारखा त्यांचा खेळ चालू होता. जणू लहान मुले खेळत; पण आणखी एक महिन्याचे हेच शुभ्र मेघ कृष्णवर्ण होतील, जाड होतील, व सा-या आकाशाला झाकोळून टाकतील.

परवा वारे अशा सोसायट्याचे सुटले म्हणतेस ! माझे अंथरूण उडून जाईल असे वाटले. खाटेसकट मला वारा घेऊन तर नाही ना जाणार असा गमतीदार विचार मनात आला. आपल्या पालगड गावातील ख-यांकडची गोष्ट आहे. ते म्हणे रात्री अंगणात माच्यावर झोपले होते. सकाळी ते उठले तेव्हा ते तांबड्याच्या माळावर होते! त्यांच्या माच्यासकट रात्री तांबड़्याच्या माळावर आणून टाकले कोणी? अंतर तरी का कमी? चांगले मैल-पाऊण मैल. भुताने त्यांना खाटेसकट उचलून नेले असावे, असे लोक म्हणाले. आम्ही लहानपणी अंगणात रात्री झोपलो म्हणजे ही दंतकथा डोळ्यांसमोर येत असे. झोप लागेपर्यंत भीतीही वाटे. परंतु कधी कोणाची खाट दूर गेली नाही. परवाच्या रात्रीच्या वादळाच्या वेळेस ती गोष्ट मला आठवली!

वारा म्हणजे अद्‍भूत वस्तू! तो दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व सारखे भासते. कोठून येतो तो, कोठे त्याचे घर? तो दरीत राहतो की गुहेत राहतो? वनात राहतो की डोंगरात? आकाशात की पाताळात? वा-यावर आपले जीवन अवलंबून आहे. हवा म्हणजे वाराच ना? हवा अधिक चलनवलन करू लागली म्हणजे आपण तिला नाना नावे देतो. वारा झाडांमाडांशी खेळेल, फुलांजवळ गुजगोष्टी करील, लाटांजवळ धिंगामस्ती करील. मनुष्य घामाघूम झालेला असावा. वा-याची एक झुळूक आली तर परमानंद होतो. परंतु हा खेळकर प्रेमळ वारा कधी कधी रुद्र रूप धारण करतो. मग तो डोंगर उडवील, समुद्रात पर्वतप्राय लाटा उठवील, वाळूचे ढीग वर नेईल व एकदम खाली फेकील, झाडे मोडील, घरे पाडील, फुलांना नाचवणारा फुलांच्या फाडफाड थोबाडीत देईल. सुधामाई, प्रत्येकाचे सौम्य व रुद्र रूप असते. कृष्ण परमात्याने अर्जुनाला ते रुद्र असे विराट रूप दर्शविले तेव्हा अर्जुन म्हणाला, ''देवा, तुझं ते सौम्य रूपच दाखव.''

आपले दादा आजारी होते. त्यांना मधून वाताची लहर येई. एके दिवशी रात्री सारखे श्लोक, कविता म्हणत सुटले. मी मनात म्हटले, अशा वेळेस थोडे रागवावे लागते. मी दादांना म्हटले, ''गप्प राहता की नाही? झोपायचं नाही का?'' मी रागावलो आहे असे दाखविले. दादा गप्प राहिले. त्यांना मागून जरा झोप लागली. परंतु दुसरे दिवशी रात्री मी दादांना हसत म्हटले, ''झोप नाही का येत?'' तेही हसत म्हणाले, ''येईल. तू नारसिंह रूप नको दाखवू.'' मी रागावलो, ते दादांच्या लक्षात राहिले. मला वाईट वाटले. पुढे मी कामासाठी महिना दोन महिने बाहेरगावी गेलो. दादा सोडून गेले तेव्हा मी जवळ नव्हतो. परंतु मी त्यांच्यावर आजारीपणात रागावलो याची आठवण आली म्हणजे अजून माझे डोळ भरून येतात. आजा-यावर कधीही रागवू नये. कारण, एखादे वेळेस कायमचा वियोग व्हायची ती वेळ असते.

अरुणासाठी आंबे पाठवले होते. ती आंबा आंबा करते असे अप्पाने लिहिले होते. मला आंब्याची पारख नाही.  गोड़ निघाले की नाही ते कळव. तुम्ही नवीन लोणचे घातले का? अप्पास व सौ. ताईस सप्रेम प्रणाम. अरुणास स. आशीर्वाद.

अण्णा

साधना १३ मे १९५०

« PreviousChapter ListNext »