Bookstruck

सुंदर पत्रे 45

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुधा, तू पुढे घेशील अशा जीवनाला वाहून? तुझ्या वडिलांची इच्छा होती ती, वसंताने दवाखाना घालावा, खेडयापाडयांची सेवा करावी. तो तर देवाघरी गेला. दादांची इच्छा तू करशील पुरी? शीक, डॉक्टरी ज्ञान मिळव आणि कोकणात जा. गरीब आयाबायांची सेवा कर. नदी ज्याप्रमाणे ओलावा देत वाहात राहते त्याप्रमाणे तुझी जीवनसरिता सर्वांच्या जीवनाला ओलावा देत राहो. तुझ्या मनात असे विचार येवोत. भारतात जगातून मिशनरी बायका येतात, सेवा करतात. भारतातून अशा सेवापरायण भगिनी का न पुढे याव्यात? सा-या जगात सेवावृत्तीस भारत का मागे राहणार?

परवा मला लहानपणचा एक मित्र भेटला. किती वर्षांनी! आम्ही भेटलो! सारे बाळपण आठवले. खोडया आठवल्या. मी त्याला पिकलेले आंबे देत असे. तो मुद्दाम माझा पत्ता काढीत आला नि मला बघताच त्याने मला मिठी मारली. मी त्याला म्हटले, जेवायला राहा. आज माझ्या हातची तुला मेजवानी. आणि मी स्वयंपाक केला. तो गोष्टी बोलत बसला. आम्ही दोघे जेवलो. जेवताना गोष्टी निघत नि बोलण्यात जेवण तसेच राही. जेवणे संपली. मी आवराआवर करीत होतो. तो बाहेरच्या खोलीत उभा होता. दारात उभा होता. मी जो काम आटोपून आलो तो त्याच्या डोळयांतून मुके अश्रू वाहात होते.

''काय रे, काय झालं?'' मी विचारले.

''किती वर्षांनी आपण भेटलो. पुन्हा कधी भेटू? आपण दोघे पुन्हा लहान झालो तर?''

''तू वेडा आहेस. अरे, आपण एकमेकांच्या जवळच आहोत. मी तुला खरं सांगू. मी तरी प्रेमाच्या घरात राहात असतो. तुला ती इंग्रजी कविता माहीत आहे? मलाही सारी आठवत नाही. परंतु 'I live in friendship's home.' मैत्रीच्या घरात मी राहतो अशा अर्थाचे ते चरण आहेत. मी कधी एकटा बसलो म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझ्या जीवनाला प्रेमाचा ओलावा दिला त्यांना स्मरतो, त्यांची मनोदय भेट घेतो, प्रभू त्यांना सुखी ठेवो अशा प्रार्थना करतो. उगी, रडू नकोस.''

''अशीच माझी आठवण ठेवा. कोणी तरी प्रेमानं आपली आठवण करतो या विचारात केवढं समाधान आहे?'' तो सकंप आवाजात म्हणाला.

माझा मित्र गेला. परंतु प्रेमाचा परिमल पुन्हा दरवळून गेला. मोकळे निरपेक्ष प्रेम. प्रेम निर्भय असते. मुक्त असते., गुलामगिरीत प्रेम कोठले? निरनिराळया राजसत्ता दंडुक्याने, कायद्याने प्रेम मिळवू पाहतात. अशाने का प्रेम मिळते? दंडुका प्रेम नसतो निर्मित. दंडुका हे दास्याचे चिन्ह आहे. इंग्रजी 'फ्री', 'फ्रेंडशिप' वगैरे शब्द आणि संस्कृतमधील 'प्री' म्हणजे प्रसन्न करणे, प्रीती, प्रेम इत्यादी एकाच धातूपासून निघालेले. जेथे 'प्री' म्हणजे प्रेमभावना आहे, तेथे 'फ्री' म्हणजे मोकळेपणाही हवा. 'फ्रीडम्'चे म्हणजे स्वातंत्र्याचे उपासक फ्रीडमचा हा अर्थ विसरतात.

भारतात असे मोकळे प्रेम वाढो आणि जीवन सुखकर होवो.

मी तुला पत्र लिहीत आहे. दुपारचे दोन वाजले आहेत. ऊन मी म्हणत आहे. ती बघ बाहेर एक बादली आहे. तिच्यात थोडे पाणी आहे. तो बघ एक कावळा कोठून तरी आला. चोच वासून आला. तहानलेला आहे बिचारा. बादलीवर बसून वाकून पाणी पिणार तोच कोणी तरी त्याला खडा मारला. गेला बिचारा उडून. मला वाईट वाटले: परंतु दूर एके ठिकाणी पाणी सांडलेले होते. तेथे तो पुन्हा आला व चोचीने त्या मातीतील पाणी पिऊन गेला उडून. सुधामाई, मला कावळा फार आवडतो. कावळयाने पाण्याच्या मडक्यात खडे टाकून पाणी कसे वर आणले ही त्याच्या शहाणपणाची गोष्ट तू वाचली असशील. कावळा काव काव करू लागला म्हणजे आपण म्हणतो, ''पाहुणा येणार असेल तर गप्प राहा.'' अग, रस्त्यात आपण थुंकतो, नाक शिंकरतो. कावळे ती घाण खातात व स्वच्छता निर्मितात. तो वाकुल्या कशा दाखवतो? चोच कशी घासून पुसून स्वच्छ करतो! मला कावळयाचे फार कौतुक वाटते. चिमणी, कावळा हे जणू आपले राष्ट्रीय पक्षी आहेत!

« PreviousChapter ListNext »