Bookstruck

सुंदर पत्रे 50

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मनुष्य आपणाला कधीच संपूर्ण कळत नसतो. माणसाच्या स्वभावाचे थोडे दर्शन याला होते, थोडे त्याला होते, आणि तेवढयावरून हा मनुष्य भला की बुरा असा निर्णय देऊन आपण मोकळे होतो. परंतु ती केवढी चूक असते, नाही?

काल मला पालगडच्या बेलवाडीतील एक मनुष्य भेटला. आम्ही दोघे बोलत बसलो. किती आठवणी निघाल्या? बेलवाडीतच माझ्या लहानपणी नारायणराव जाधव यांच्या अंगात देव यायचा. ते केवढयाने ''फो फो'' करायचे. सारा गाव दणाणायचा, आणि जे कोणी येतील त्यांच्या अंगावर तांदूळ फेकायचे. कोणाला साप चावलेला, कोणाच्या अंगावर कोळयाचा वगैरे विखार उठलेला, अशी माणसे तेथे जमायची. त्या तांदुळांनी म्हणे गुण यायचा. नारायणरावांच्या अंगात काही वर्षे देव येत असे. पुढे येईनासा झाला. आम्ही लहानपणी बेलवाडीतून जाताना भीत असू, घळीतून जायचे. किती किर्र झाडी नि रान. परंतु या बेलवाडीतच अंगात देव येणारे नारायणराव राहतात या विचाराने आमची भीती कमी होत असे.

त्या गावक-यांजवळ बोलताना सा-या गावची उजळणी होत होती. कोण आहेत, कोण मेले सारे विचारीत होतो. आमच्या बोलण्यात गंगुअप्पांच्या ओटीवर बसून नेहमी जानव्यासाठी सूत काढणारे विनुभाऊ महाळुंकर आले होते. समोरच आमची शाळा असे. पाणी प्यायला आम्ही ओकांकडे जायचे. तेथे पाण्याचे तपेले आम्हा मुलांसाठी भरलेले असे. आम्ही भांडू लागलो तर विनुभाऊ तिकडून दरडावायचे. त्यांची चाती सारखी सुरू असे. जानवी करणे व पत्रावळी लावणे हा त्यांचा धंदा. सूत काढून थकले की पत्रावळी लावायचे, पत्रावळी लावून थकले की सूत कातायचे. त्यांचा हात कधी रिकामा नसे. तीन फाशांनी खेळण्यातही ते पटाईत होते, त्यांचा मुलगा अंधळा होता. परंतु हा अंधळा सा-या गावभर हिंडे, शेतावर जाई. आवाजावरून गुरे ओळखी. हा अंधळा मुलगा म्हाता-या विनुभाऊंचा आधार होता. रात्रीबेरात्री काठी ठोकीत तो यायचा, जायचा. अंधळयांचा दिवस काय, रात्र काय? म्हणेल तेव्हा त्याचा दिवस, म्हणले तेव्हा त्याची रात्र. खरेच तो अंधळा माझ्या डोळयांसमोर येतो. किती काम करायचा तो! आणि मोन्या पटवर्धन आठवतो का! तो मुका आणि बहिरा. परंतु त्याच्या बोटांत कला होती. गणपतीची मूर्ती किती सुंदर बनवायचा! मोन्या हरकामी होता. सुंदर दोर वळायचा, खाटा विणून द्यायचा. मला वाटते, एखादे इंद्रिय गेले तर तिकडची शक्ती दुस-या इंद्रियात येते. आंधळयाचे स्पर्र्शज्ञान तीव्र असते. मुके, बहिरे यांच्याजवळही दुसरी कोठली तरी शक्ती असते, आणि मोन्या पटवर्धनावरून मोहन्या मारवाडयाची आठवण आली. तुझ्या दादांचा तो वर्गमित्र. मोहन्याची सावत्र आई होती. तिचे नाव रामप्यारी. तिला लहान मुलगा होता. त्याचे नाव बद्री. रामप्यारीला भुताने पछाडले. तिची दातखिळी बसली. पुढे ती मेली. लहान बद्री मातृहीन झाला आणि हा मोहन्या या सावत्र भावाला मारायचा,- करंदीकरांच्या घोडविहिरीत त्याला न्यायचा व तेथे त्याला मारायचा. त्याचे रडणे ऐकू जाऊ नये म्हणून. लहान बद्रीचा केविलवाणा चेहरा अजून माझ्या डोळयांसमोर येतो. आईवेगळा लहान मुलगा!

मनुष्याची दुष्टता, कठोरता पाहून कधी कधी वैताग येतो. तो वर्डस्वर्थ कवी एके ठिकाणी म्हणतो :

''What man has made of man  - माणसानं माणसाची काय दशा केली आहे पहा! '' माणसाला मन आहे, बुध्दी आहे, हृदय आहे. शेक्सपीयर कवी उचंबळून म्हणतो, ''मनुष्य,- ईश्वराची किती ही थोर निर्मिती! कसा याचा देह, कसं याचं मन, कशी आहे याची बुध्दी!'' परंतु सृष्टीतील ही अलौकिक निर्मिती शापरूप ठरवावी ना! कधी सुधारणार हा मानव? अमेरिकन कवी व्हिटमन म्हणायचा, ''पशुपक्षी बरे. नको हा शापरूप मानव!''

« PreviousChapter ListNext »