Bookstruck

सुंदर पत्रे 62

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुधामाई, मानवी विकास हळूहळूच होतो. इतिहास शिकवितो की, मुंगीच्या पावलाने प्रगती होत असते. आपणाला वाटेल होते की, स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व प्रश्न सुटतील; परंतु आज अधिकच अंधार सभोवती आहे. आशेने, उत्साहाने धडपडत पुढे जायचे येवढेच आपले काम.

तुकारामांची पुण्यतिथी सर्वत्र उत्साहाने साजरी झाली. एकनाथांचेही स्मरण ठेवू. पैठणला म्हणे अजून तो हौद आहे, ज्यात भगवान गोपालकृष्ण कावडी आणून ओती. दंतकथा सांगतात की, किती कावडी ओतल्या तरी हौद भरत नाही; परंतु गुपचूप प्रभू येतो व कावड ओततो तेव्हाच हौद भरतो. दंतकथेतील भावार्थ घ्यायचा. मनापासून आपण जे करतो त्यात अपार शक्ती असते. द्रौपदीने दिलेल्या भाजीच्या एका पानाने कृष्णाला ढेकर आली, शबरीच्या बोरांनी रामराय सुखावले. तुला शंकराचार्यांची एक गोष्ट माहीत आहे? ते लहानपणी भिक्षा मागत एका झोपडीजवळ आले. झोपडीत एक दरिद्री म्हातारी होती. या लहान बाळाला द्यायला काही नाही म्हणून म्हातारीला वाईट वाटले. तिच्याजवळ एक आवळा होता तो आवळाच प्रेमाने तिने शंकराचार्यांच्या झोळीत टाकला! तो काय आश्चर्य. आकाशातून सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी पडली! त्या म्हातारीने प्रेमाने दिलेल्या त्या एका आमलकात विश्वातील सारे वैभव खेचून आणायची शक्ती होती. आजही त्रावणकोरात “सोन्याचे घर” म्हणून त्या म्हातारीचे घर दाखविण्यात येत असते.

रवीन्द्रनाथांनीसुद्धा अशीच एक सुंदर कविता लिहिली आहे : “तू, राजराजेश्वर, सोन्याच्या रथातून आलास आणि माझ्यासारखा भिका-यापुढे हात पसरलास. माझ्या झोळीतला एक दाणा मी तुला हातावर ठेवला. मी घरी गेलो. पाहतो तो झोळीतील दाण्यातील एक दाणा सोन्याचा झाला होता. मग वाटले, सारेच धान्य त्याला दिले असते तर!” जे जगाला द्याल ते फुकट नाही जाणार; आणि हृदय ओतून जे द्याल त्याची तर किंमतच नाही.

सुधा, मला या गोष्टी फार आवडतातं. साध्या गोष्टी; परंतु केवढी शिकवण असते त्यांच्यात. तुरुंगात मी अशा छोट्या छोट्या गोष्टी रात्री मित्रांना सांगायचा. आम्ही अंथऱुणावर पडलो म्हणजे ते मला म्हणायचे, “तुमचे किस्से करा सुरु!”

नवीन वर्ष सुरू झाले. उत्तर हिंदुस्थानात बहुतेक सर्वत्र विक्रम संवत आहे. कार्तिकात त्यांचा वर्षारंभ. आपल्याकडेच चैत्र महिन्यापासून वर्षारंभ होतो. शालिवाहन राजाचा अंमल ज्या ज्या प्रदेशावर होता, तेथे तेथे चैत्रापासूनच वर्षारंभ आहे असे वाटते.

‘चैत्र-वैशाख वसंतऋतू-‘ असे आपण परवचा शिकवताना मुलांना शिकवतो.
सर्व ऋतूंचा वसंत जणू राजा. जुन्या काळच्या मराठी पुस्तकांत –

ऋतूंमध्ये हा पहिला वसंत | वाटे जनांना बहुधा पसंत ||

असा एक श्लोक होता. सा-या सृष्टीत नवजीवन येत आहे, बहर आहे. सृष्टी जणी रंगपंचमी खेळत आहे. लाल लाल फुले सर्वत्र दिसतात. शेवरी, पळस, कांचन, सर्वत्र लाललाल फुले. अग, मुंबईस एक प्रकारचा पारिंगा रसत्याच्या बाजूला लावलेला आढळतो, त्यावरही लाल तुरे दिसतात. कोकणात पारिंग्यावर लाल फुले मी कधीही पाहिली नव्हती. हा का विलायती पारिंगा? कांचनाचेही किती प्रकार! कांचनाची फुले वास्तविक नावानुरुप पिवळी हवीत. कांचन म्हणजे सोने. परंतु या ऋतूत फुलणा-या कांचनाला लाल फुले असतात. जाडसर पाकळ्या आपल्या बाबूकाकांच्या परसवात लाल कांचनाचे झाड होते. खोंड्यात राहणा-या गोविंद भटजींच्या घरी पांढ-या कांचनाचे झाड होते. काही कांचनाची झाडे पावसात फुलतात.

« PreviousChapter ListNext »