Bookstruck

जर्मन महाकवी गटे 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महाकवी हे जगाचे असतात आणि विशेषत: गटे हा खरोखरच राष्ट्रातीत होता. त्याने जर्मन लोकगीतांना जी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे, तीत तो म्हणतो : “लोकांचे, विशेषत: मुलांचे इतर राष्ट्रांच्या गुणांकडे लक्ष वेधून घेण्याची वेळ आली आहे.” गटेची वृत्ती विश्वात्मक होती. तो लहानशा वस्तूंतही विश्व पाही. ‘पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी’ ही भारतीय भावना गटेच्या जीवनात दिसून येते.

१७४९ ऑगस्ट २८ ला दुपारी त्याचा जन्म झाला. त्याचे पणजोबा लोहार होते. आजोबा शिंपी होते. परंतु वडील पंडित होते, राजाचे सल्लागार होते. आजोबा-पणजोबांचा धंदा त्यांनी मुलाला कधी सांगितला नाही. गटेची आई साधी, सरळ होती. पतीत आणि तिच्यात वयाचे बरेच अंतर. गटे जन्मला तेव्हा पित्याची चाळीशी उलटलेली; परंतु आई अठरा वर्षांची होती. ती लहान गटेला गोष्ट सांगे. गटे म्हणतो : “पित्यापासून जीवनाची गंभीर दृष्टी मी घेतली. आईपासून गोष्टी सांगण्याची आवड मिळविली.

वैचारिक बंडखोर
अठरावे शतक क्रांतिकारक. अमेरिका स्वतंत्र झाली. फ्रेंच राज्यक्रांती झाली. परंतु जर्मनीत राजकीय क्रांती झाली नाही. तेथे वैचारिक बंड झाले. ल्यूथरने पूर्वी पोपविरुद्ध बंड जर्मनीतच केले. गटे वयाच्या सहाव्या वर्षी म्हणाला, “कोठला देव नि काय!” पित्याने त्याला लॅटिन, ग्रीक या भाषा लहानपणीच शिकविल्या. जगाचा इतिहास शिकविला. गटेने आठव्या वर्षी लॅटिन भाषेत निबंध लिहिला. अकराव्या वर्षी सात भाषांत एक कादंबरी लिहिली. चौदाव्या वर्षी प्रेमात सापडला. असा हा उच्छृंखल मुलगा वाढत होता. लिपझिम येथील विद्यापीठात शिकत होता. परंतु आजारी पडला. मरायचाच, पण वाचला. पुढे स्ट्रासबर्ग येथे कायदेपंडित व्हायला गेला. परंतु अभ्यासाकडे त्याचे लक्ष नसे. लहरीप्रमाणे वाची. वैद्यक, संगीत यांचाही अभ्यास करी. नवीन खेळ खेळायला शिकला. तो दिसे भव्य. नाक सरळ, मोठे. भुवया आणि डोळे आकर्षक, रुंद कपाळ. त्याला पाहताच सारे दिपून जात. तो हॉटेलात गेला तर खाणे-पिणे विसरून सारे त्याच्याकडे बघत राहत. तो स्वत: म्हणतो, “मी यौवनाने जणू मस्त होतो.”

अनुभवाचे सोने करी
किती तरी मुलींवर त्याने प्रेम केले. काहींनी त्याला सोडले. त्याने काहींना सोडले. त्या त्या वेळेस ती प्रेमोत्कटता खरी असे; परंतु त्याच्या सर्व जीवनाला ती व्यापू शकत नसे. मनावरचे भार काव्यात ओतून तो पुढे जाई. मिळणा-या अनुभवाचे काव्यमय सोने करी. नाटक लिहिण्यासाठी जर्मन इतिहास त्याने धुंडाळला, आणि गॉट्झ् या वारावर त्याने नाटक लिहिले. गॉट्झ् गरिबांची बाजू घेणारा, श्रीमंतांना नाडणारा. हे नाटक तरुणांना जणू बायबल वाटले. उच्छृंखल जीवन जगणे म्हणजे धर्म असे त्यांना वाटू लागले.

« PreviousChapter ListNext »