Bookstruck

धडपडणारा श्याम 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आकाश चांगलेच भरुन आले. पाऊस पडणार असे वाटले; परंतु माझ्याने तेथून जाववेना. तसा रोहर्षक देखावा मी पुन्हा कधीही पाहिला नाही. पुढे पुष्कळ वर्षानी मी एकदा उज्जयिनीस गेलो होतो. त्या वेळेस तेथील क्षिप्रा नदीच्या तीरावर मोर नाचताना मी पाहिले होते. तेही श्रावणाचेच दिवस होते. परंतु औंधचा देखावा भव्य होता.मी तन्मय झालो होतो. सारे भान विसरलो होतो. आता पाऊस पडू लागला. मोत्यांसारखे थेंब पडू लागले. मी तोंड उघडून चातकाप्रमाणे पर्जन्यबिंदू पिऊ लागलो. मी मोर झालो होतो, चातक झालो होतो. वर आ करुन, हातात टोपी धरुन, मी नाचत होतो.

पाऊस जोरात पडू लागला. शेवटी ते मत्त मोर सोडून मी निघालो. मी बराच लांब आलो होतो. रस्त्यात चिखल झाला होता. मी बहाणा हातात काढून घेतल्या; परंतू एके ठिकाणी पायात काटा मोडला. अत्यंत वेदना झाल्या. पाय जड झाला. मोठा काटा असाबा. मी कसातरी चालत होतो. मध्येच एखादा खडा त्या काटा बोचलेल्या जागेला लागे व मरणान्तिक वेदना होत. मी सारा ओलचिंब झालो होतो. डोक्यावरील केसांचे पाणी सारखे गळत होते. मधून मधून मी पाणी निपटीत होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. खोली उघडली. दिवा लावला.

''काय रे हे श्याम! सारा भिजलास की, '' म्हातारी आजी म्हणाली.
''सकाळी तुम्ही प्रेमाने भिजवलंत, आता पावसाने पाण्याने भिजविलं,'' मी म्हटले.
''कोरडं नेस आधी, मग बोल,'' ती म्हणाली.
मी कपडे बदलले. भिजलेले कपडे पिळून दोरीवर टाकले. मी घोंगडीवर बसलो.
''स्वयंपाक नाही का करायचा?'' आजीने विचारले.
''आत्ता भूकच नाही. सकाळी भाकरी जास्त झाली. अजून भाकरी भाजून मला पचत नाही,'' मी म्हटले.
''खोंटं काही तरी. आळस करीत असशील, परंतु मी भाकरी भाजून ठेवली आहे,''
म्हतारी म्हणाली.

'म्हणजे !' मी आश्चर्याने म्हटले.
''म्हणजे काय? ती खा. द्रुपदीच्या आईने चवळया केल्या आहेत त्यांच्याशी खा,''
ती म्हणाली.

एका ताटात भाकरी नि पळीवाढया चवळया वाढून, म्हातारी घेऊन आली. मला काय करावे ते समजेना.
''बघतोस काय?'' म्हातारी म्हणाली.
''एखादे वेळेस कालवण घेणं निराळं. परंतु असं सारखं घेणं चांगलं नाही. मी पीठही दिलं नव्हतं,'' मी म्हटले.
''परंतु मी दिलं आहे. दु्रपदीची आई गरीब आहे. मला माहीत आहे,'' आजी म्हणाली.
''आणि तुम्ही का श्रीमंत आहात?'' मी विचारले.
''आम्ही खाऊन-पिऊन सुखी आहोत, श्याम,'' ती सहृदयतेने म्हणाली.

माझ्याने 'नाही' म्हणवेना. माझा पाय दुखत होता. ठणकत होता. मी भाकरी खाल्ली नि ताट उचलून नेऊ लागलो; परंतु लंगडत होतो.

''श्याम, पायाला रे काय झालं?'' कनवाळूपणाने म्हातारबायने विचारले.
''पायात मोठा काटा बोचलाय नि फार दुखतोय,'' मी म्हटले.
''कुठे गेला होतास रानावनात?''

''मी नाचणारे मोर पाहिले. नाचणारा मोर मी पूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे उशीर झाला. पाऊस पडू लागला. रस्त्यात चिखल. वहाण काढून घेतल्या तर काटा बोचला,'' मी इतिहास सांगितला.

« PreviousChapter ListNext »