Bookstruck

धडपडणारा श्याम 57

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकृतीस जप. शरीर वाढण्याचे हे दिवस, ह्या वयातच शरीराची वाढ होणार अशा वेळी जर नीट पोषण झालं नाही, तर ते कायमचं अशक्त व दुबळं राहील. फार आबाळ करू नकोस. थोडे अधिक पैसे लागले तरी कळव. मावशीला आपल्यासाठी कशाला त्रास' असं मनात आणू नकोस. उगाच मनाला लावून घेऊ नकोस. देव सारं चागलं करील.

तुझी मावशी

मावशीचे पत्र मी कितीदा तरी वाचले. पत्रे हीच माझी ठेव होती. मी किती तरी पत्रे लिहीत असे. दापोलीच्या शाळेतील मित्रांना कधी कधी लिहीत असे. रामला लिहीत असे. दादाला लिहीत असे. घरी लिहीत असे. आमच्या शाळेत सर्वात जास्त कोणाला पत्रे येत असतील, तर ती मला.

ज्या दिवशी मी उदास असे, त्या दिवशी माझी ट्रंक उघडून मी सारी पत्रे वाचीत बसे. ते माझे नवजीवन होत. अमृतरसायन होते. रामची पत्रे, मावशीची पत्रे अशी मी सारी अलग अलग बांधून ठेवली होती. पुष्कळ मुलांना माझ्या  टपालाचा हेवा वाटे. दरिद्री श्याम पत्रप्राप्तीच्या बाबतीत चक्रवर्ती होता. मुलांनाच माझ्या पत्रांबदल कुतूहल असे, असे नाही, तर पोस्टमास्तरांनाही जिज्ञासा उत्पन्न झाली. हा श्याम कोण? इतकी पत्रे त्याला कशी येतात? मावशीचे पत्र म्हणजे बहुधा पाकीट असे. त्यावर पत्ता असे तो बायकी हस्ताक्षरात असे. बायकी हस्ताक्षराचे कोडे उलगडले पाहिजे, असे त्या पोस्टमास्तारांना वाटले.
एके दिवशी मी पोस्टात काही कामासाठी गेलो होतो?

''तुम्ही का ते श्याम?'' मास्तरांनी विचारले.
''ते श्याम म्हणजे कोणते?'' मी प्र९न केला.
''ज्यांना पुष्कळ पत्रं येतात ते?'' पोस्टमास्तर हसत म्हणाले.
''माझे चित्र पुष्कळ आहेत. म्हणून पुष्कळ पत्रं येतात,'' मी म्हटले.
''मित्र उभयजातीचे आहेत वाटतं?'' त्यांनी विचारले.
''हो. हिंदूही आहेत, मुसलमानही आहेत,'' मी म्हटले.
''तसं नव्हे. पुरुष-मित्र व स्त्री-मित्र दोन्ही आहेत वाटंत?'' त्यांनी उलगड केला.
''म्हणजे काय?'' मी बुचकळयात पडलो.
''अहो, तुम्हांला पत्रं येतात, त्यांत स्त्री-हस्ताक्षराचीही असतात, म्हणून विचारलं,''
पोस्टमास्तर म्हणाले.
''माझ्या मावशीची असतात ती पत्रं. ती शिकलेली आहे,'' मी म्हटले.
''माफ करा हं मिस्टर,'' पोस्टमास्तर ओशाळून म्हणाले.

माझ्या जीवनात अमृतवर्षाव करणा-या मावशीच्या पत्रांबद्दल पोस्टरमास्तरांच्या मनात कसा विचित्र संशय आला, ह्याचे राहून राहून मला आश्चर्य वाटे!

« PreviousChapter ListNext »