Bookstruck

धडपडणारा श्याम 88

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महापुरुषाचे महाप्रस्थान

मी रात्री आठच्या सुमारास पुण्याला आलो. मामांकडे उतरायला गेलो. ज्या वाडयातून लहानपणी मी पळालो होतो, तोच तो वाडा. माझ्या माणिकताईचा वाडा. मामीच्या मुली अंगणातच होत्या. लहानपणी जिला मी खेळवीत असे  व चिमटे घेऊन रडवीत असे, ती एशी तेथेच होती. प्लेगमधून वाचलेली अशक्त शांताही तेथे होती. मामीने माझे स्वागत केले. मामा अद्याप बाहेरुन आले नव्हते.

'श्याम, तू जेवून घे. त्यांचा नेम नाही,'' मामी म्हणाली.
मी जेवण केले. एशी-शांतीला मी गोष्टी सांगितल्या. त्यांनी गोष्टी सांगत होते, तो मामा  बाहेरुन आलो.
''केव्हा रे आलास,'' त्यांनी विचारले.
''मघाशी आलो,'' मी म्हटले.
''औंधची शाळा झाली का सुरु?'' त्यांनी प्रश्न केला.
''बहुतेक झाली असेल. बंद होऊन महिना झाला. आता जावं झालं तिथे,'' मी म्हटले.
''सदानंद तुझी आठवण काढायचा हो. तुला तार करणार होतो, पण एकदम मुळी वात झाला,'' मामा खिन्नपणे म्हणाले.
''लिली आणि तो दोघं एकदम गेली,'' शेजारच्या बाई म्हणाल्या.

मी एकदम उठून गेलो. वरच्या खोलीत गेलो. ज्या खोलीत सदानंद मरताना होता, त्या खोलीत गेलो.
''श्याम, दिवा ने. शांते, अण्णाला दिवा दे जा,'' मामांनी सांगितले.

मला दिवा नको होता. माझ्या भावांच्या आत्म्याची मला भेट घ्यायची होती. ती का दिव्याच्या बाहय प्रकाशात घेता आली असती? शांतीच्या हातातून मी दिवा घेतला. मी तो मालवला. तसाच अंधारातून मी खोलीत गेलो. त्या खोलीत प्रेमळ व पवित्र स्मृतींनी ओथंबून येऊन मी उभा राहिलो.

मी माझे हात पसरले. सदानंदाला भेटण्यासाठी मी वेडा झालो होतो. माझ्या हाताला कोणी लागते का, ते खोलीत हिंडून मी बघत होतो! मी साष्टांग प्रणाम केला. देवाचे स्मरण करीत जाणारा तो माझा भाऊ म्हणजे देवदूत होता. मृत्यूलोकाची दूषित हवा त्या निर्मळ पुण्यात्म्याला मानवली नाही. ते पाखरु मृत्यु - लोकांच्या कोंदट पिंज-यात तडफडू लागले. पिंज-यातून ते उडून गेले. मी खोलीतील अनंत अंधारात स्मृतीचा नंदादीप पाजळून बसलो होतो. त्या प्रकाशात भावाला बघत होतो.

''श्याम दिवा विझला वाटतं? अरे, पुन्हा लावावा की नाही? ही घे पेटी. असं अंधारात बसू नये,'' मामा वर येऊन म्हणाले.
माझ्या भाव-समाधीला भंग झाला. मी दिवा लावला. खोलीत प्रकाश आला, परंतु माझ्या डोळयांसमोर अंधार आला. तो दिवा मला सहन होईना.

''मी झोपतो हां मामा. इथे गॅलरीतच झोपतो,'' मी म्हटले.
''अरे, थंडी फार पडते हो. तेव्हा आतच झोप,'' ते म्हणाले.

मी आत अंथरुण घातले. मी कधही डोक्यावरुन पांघरुण घ्यायचा नाही, पण आज मी डोक्यावरुन पांघरुण घेतले. पांघरुणात अंधाराचा दिवा मी पुन्हा लावला. माझ्या भावाला भेटायला अंधाराच्याच प्रकाशाची आवश्यकता होती. मी पांघरुणात सदानंदाशी बोलत होतो. बोलता बोलता एकदम म्हटले, ''सदानंद, मलाही घेऊन जा ना रे. मलाही होऊ दे प्लेग.'' पण मनातले हे शब्द मनातच गुदमरले. मला आई आठवली. आईचे कसे होईल? तिला किती दु:ख होईल? आईसाठी मला जगलेच पाहिजे. आई जिवंत आहे तोपर्यंत, मी मरणाचा विचार मनात आणणे, म्हणजे पाप होते. आईचे न ऐकता मी आलो. संक्रातीला राहिलो नाही. मला आता खूप वाईट वाटले. मी मुसमुस लागलो.

''श्याम, पेरू फोडलाय. ऊठ, हर घे,'' मामी म्हणाली.
''गोड निघालय. आणखी फोड ग,'' मामा म्हणाले.

उठणे भागच होते. मी डोळे पुसून उठलो. पेरूची फोड खाऊ लागलो. मामांशी बोलू लागलो.

''औंधला आहेत रे पेरू?'' त्यांनी विचारले.
''औंधला फारशा बागा दिसल्या नाहीत; परंतु माझ्या मित्राच्या नावडी गावी मी पेरूच्या मोठमोठया बागा पाहिल्या. ताजे ताजे पेरूही खाल्ले,'' मी म्हटले.
''तू औदुंबरला गेला  होतास रे? '' त्यांनी विचारले.

« PreviousChapter ListNext »