Bookstruck

धडपडणारा श्याम 95

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'' उठा हो. ताट वाढलं आहे'' एक नोकर म्हणाला.

मी हात पाय धुतले, चूळ भरली. मी पाटावर बसलो. तीन दिवसांचा मी उपाशी होतो; परंतु जेवण तर जाईना. पाण्यानेच पोट भरले. मी भातच खाल्ला. मागून थोडा दहीभात घेतला. ''तुमच्या खाणावळीचा दर काय?'' मी विचारले.

''नऊ रुपये. दहा रुपये, अकरा रुपये, मालक म्हणाले
''मी एकच वेळ जेवलो, तर साडेचार रुपयेच घ्याल ना?'' मी माहिती विचारली. ''एक वेळ जेवलात, तर पाच रुपये,'' त्यांनी सांगितले.
''मग मी एक वेळ येत जाईन. पैसे मागून दिले तरी चालतील ना?'' मी विचारले,'' निम्मे पैसे आधी हवेत,'' ते म्हणाले.
''पण आजचे चार आणे देऊन जा. उदया तुम्ही पैसे दिलेत, तर त्यात मग हे धरु. समजलं ना?'' ते म्हणाले.
''बरं,'' मी म्हटले.

मी चार आणे दिले. बुधवारच्या बागेत बसून मी घरी आलो. रात्री अभ्यास केला. अशा रीतीने माझा कार्यक्रम सुरु झाला. मी फक्त दुपारी जेवत असे. माझ्याजवळची काही पुस्तके मी विकली आणि खाणावहीचे निम्मे पैसे दिले. रात्रीच्या वेळेस बुधवारच्या बागेत हवा खाणे, हेच माझे जेवण होते!

मी ती इंग्रजीची पुस्तके तीन-तीन वेळा वाचली. इतर विषयांचीही थोडी थोडी उजळणी केली. परीक्षा सुरु झाली. माझी उत्तरे बरी गेली. पास होईन, अशी मला आशा होती. वर्गातील प्रत्येक मुलाला वर्गनायकाने एकेक कार्ड दिले. त्याच्यावर पालकांचा पत्ता लिहून ते परत घ्यायचे होते. परिक्षेचा निकाल मुलांच्या घरी कळवण्यासाठी ती योजीना होती. मी वर्गात नवीन आलेला. वर्गनायकाच्या मी लक्षातही नव्हतो. त्याने मला कार्ड दिले नाही, मी मागितलेही नाही. वर्गात एक नवीन मुलगा आला आहे, ह्याची फारशी जाणीवही कोणाला नव्हती. कारण मी निमूटपणे एका बाजूला बसत असे.

माझे रामच्या घरी ह्याप्रमाणे दिवस जात होते. घरी सर्वांना काळजी वाटू लागली. मी पत्र कोणालाच लिहिले नाही. मी औंधला गेलो, असेच सारी समजत होती. मुंबईहून दादाने कोकणात भाऊंना पत्र लिहिले:

'श्यामचं लक्षण काही ठीक नाही. तो कुणाचं ऐकत नाही. आपल्या लहरीप्रमाणे वागतो. कुठे गेला त्याचा पत्ता नाही. त्याचा पुण्याला एक मित्र  आहे. त्याला पत्र लिहून काही माहिती कळली, तर आपल्याला लगेच कळवीन. उगीच चिंता करू नये आपण चिंता करून काय होणार? श्यामला काहीच वाटत नाही. आईला काळजी न करण्याबद्दल सांगावं.'

अशा आशयाचे ते पत्र होते. एके दिवशी रामलही दादाचे पत्र आले.

सप्रेम नमस्कार,
माझा भाऊ तुमचा मित्र आहे. त्याचा पत्ता आपल्याला माहीत आहे का? घरी सर्व फिकिरीत आहेत. आपल्याला त्याचा ठावठिकाणा माहीत असल्यास, कृपा करून ताबडतोब कळवणे. तसदीबद्दल क्षमा करावी.
श्यामचा भाऊ

रामने ते पत्र मला दाखवले. काय उत्तर लिहायचे? दुस-या दिवशी परीक्षेचा निकाल लागणार होता. निकाल लागल्यानंतरच पत्र लिहावे असे मला वाटले. परंतु 'काळजी करू नका. श्याम सुखरूप आहे. लवकरच त्याचं तुम्हांला सविस्तर पत्र येईल.' असे पत्र लिहावे, असे रामचे मत पडले. रामने त्याप्रमाणे कार्ड लिहिले. दुस-या दिवशी आमचा निकाल जाहीर झाला. मी उत्तीर्ण झालो. मला आनंद झाला. सर्वांनाच आनंद झाला. मी सातव्या यत्तेत बसलो. रामला किती तरी मार्क होते. माझे मार्क बेताचे होते. तो व मी एका वर्गात बसू शकलो नाही. मी 'ब' वर्गात गेलो. राम 'अ' वर्गात गेला.

« PreviousChapter ListNext »