Bookstruck

धडपडणारा श्याम 108

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तो दिवस असाच होता. ''बाबूराव, आज नाही काही.'' रामने वरून सांगितले.

''तुम्ही जरा खाली या धर्मीराजे,'' बाबूरावांनी सांगितले. आम्हांला कुतहूल उत्पत्र झाले. राम खाली गेला.

''काय बाबूराव?'' त्याने विचारले.

''काही नाही. हे घ्या.'' असे म्हणून रामच्या हातात त्यांनी काही तरी दिले.

ती एक मण्यांची माळ होती. ती त्या कोटाच्या खिशात राहिलेली होती, कधीचा पडलेला कोट. त्यात काही असेल अशी शंकाही आम्हांला नव्हती.

''बाबूराव, ही माळ कशाला आणलीत?'' रामने विचारले.

''तुमची कोटाच्या खिशात चुकून राहिलेली माळ मला कशाला दादा? आंधळयाला तुळशीचया मण्यांची माळ पुरे. ही चकचकीत मण्यांची कशाला? मला डोळे नाहीत. पण देवाला आहेत. मी का चोर ठरू? माझी म्हातारी म्हणाली, 'ही चकचकीत माळ त्यांची त्यांना नेऊन दे,' मागच्या जन्माच्या पापाने डोळे गेले. ह्या जन्मी आणखी दादांनो कशाला पाप?'' बाबूराव बोलत होते.

''बरं हं,'' असे म्हणून राम वरती निघून आला.

प्रामाणिक बाबूराव 'धर्मीराजा' करीत पुढे निघून गेले. भिकारी असून निर्लोभ, भिकारी असून मातृभक्त, भिकारी असून पापभीरू, असे ते बाबूराव होते. त्या भिकारी बाबूरावांचे पाय धरावे, असे ह्या भिकारी श्यामला वाटले; परंतु तसे करण्याचे नीतिधैर्य त्याच्याजवळ नव्हते.

पुढे पुढे बाबूराव येईनासे झाले. आम्हांला त्यांची आठवण येई. आम्ही त्यांची वाट बघत असू. त्यांच्या शब्दांसाठी आम्ही आतुर होत असू; परंतु त्या 'धर्मीराजा' चे शब्द आमच्या कानांवर पडेनासे झाले. कोठे गेले बाबूराव? त्यांची वृध्द माता मरण तर नसेल पावली? आईच्या मरणाने आंधळे बाबूराव वेडे तर नसतील ना झाले? आईच्या मागोमाग तेही नसतील ना गेले? आईच्या प्रेमाचा तंतू तुटताच, त्यांचेही निराधार जीवन गळून नसेल ना पडले? आम्हांला काय कळणार? काय समजणार? ते दरिद्री, दुदैवी, सुगंधी फूल कोठे सुकले? कोठे चुरडले गेले? कोठे पडले? कोठे धुळीत मिळाले? ते आम्हांला काय माहीत?

मी व माझे मित्र जर पुन्हा कधी भेटलो, तर आम्हांला बाबूरावांची आठवण येते. बाबूराव आमच्या जीवनतील एक स्मरणीय वस्तू होऊन राहिले आहेत. भिका-यांतही जीवनाची श्रीमंती आढळते. ह्दयाची थोरवी, मनाची उदात्तता त्या उपाशीपोटी असणा-यातही आढळते. ही अशी खोलपोटी मंडळी गोलपोटया मंडळीपेक्षाही मनाने मोठी असते; परंतु ही श्रीमंती कोणाला दिसणार? कोणाला कळणार? जो नम्र होऊन ह्या भिका-यांच्या जीवनात शिरेल, त्यालाच।

« PreviousChapter ListNext »