Bookstruck

मोरी गाय 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गोपाळ मोरीला घेऊन आपल्या आश्रमात आला. एका बाजूला स्वच्छ, सुंदर गोठा होता. त्यात दहा गायी, दोन सांड होते. दोन-चार वासरे एका बाजूला होती. बाग होती. मळा होता, सायंकाळ होत आली होती. गोपाळने गाय अंगणात उभी केली. त्याची पत्नी वनमाला, तिने तिची पूजा केली. “तिची दृष्ट काढ” गोपाळ म्हणाला. गोपाळच्या भावना त्याची पत्नी ओळखी. वनमालेने दृष्ट काढली. मोरीला सुंदर व स्वच्छ गोठ्यात आणले. तिला पाणी पाजले. किती दिवसांत तिला असे सुंदर, निर्मळ जल मिळाले नव्हते. गोपाळने मोरीपुढे कडबा टाकला. “मो-ये, खा हो पोटभर. माते, सुखी हो. माझं ध्येय पूर्ण कर. मला गो-सेवा करायला हुरुप येऊ दे.” असे म्हणून प्रेमाने गोपाळने अंगावरुन हात फिरवला. ओरखडे होते तेथे तेल लावले. मोरी सुखावली होती. तिच्या डोळ्यांसमोरुन सगळा जीवनाचा पट जात होता.

गोपाळ गायीचे चारा-पाणी करुन घरात आला. वनमाला स्वयंपाक करत होती. गोपाळ हातपाय धुऊन घरात आला. घरात गोपाळकृष्णाची मूर्ती होती. गोपाळने निरांजन लावले. उदबत्ती लावली. डोळे मिटून देवाची मूर्ती अंतरी दृढ केली. “वाढ, झालं ना ?” गोपाळ वनमालेला म्हणाला.

“आज मुद्रेवर एवढा आनंद कसला दिसतो आहे ? मला तरी सांगा.” वनमाला म्हणाली.

“आज आपल्याला जणू खरीखुरी आई मिळाली. त्या गायीला पाहून मला आईंच्यासारखंच वाटलं. आज मुख्य देवता आली. आपलं ध्येय पूर्ण होणार. पुन्हा खेड्यांची गोकुळं होणार. म्हणून मला आनंद होत आहे.”

वनमालेने केळीच्या पानावर भाकरी आणि माठीची भाजी वाढली. द्रोणात दूध दिले.

“तू सुद्धा बस ना माझ्यासमोर. माझ्यासमोर बस. भाकरी तव्यावर ठेव आणि लोणी काढ., की आपल्याला ठेवलं आहेस ?” गोपाळने हसत हसत विचारले.

“हो. मी एकटी का खाईन -? विसरल्ये हो. तुम्ही लहानपणी फार लोणी खात होता, नाही का ?” वनमालेने विचारले.

“लहानपणी आई तुळशीला लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवायची आणि मग मी खायचा. आईनं सवय लावली. गायीची भक्ती शिकवली.”

गोपाळ बोलत होता. वनमालाही जेवायला बसली. नाना संवाद करत त्यांचे जेवण संपले.

« PreviousChapter ListNext »