Bookstruck

यज्ञ 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परमेश्वराचे हृदय आनंदावे व वात्सल्याने ओसंडून गेले होते. आपल्या दिव्य ज्ञानमय सिंहासनावरून तो म्हणाला, “मुलांनो ! हा पहा बाळ दधीची माझ्या मांडीवर बसला आहे. त्याने यज्ञमय असे थोर पूजन केले आहे. स्वतःचे जीवन निर्मळ करून शेवटी जगत्सेवेस त्याने दिले आहे. त्याने तुम्हाला वाचविले. एका महात्माही सकल विश्वाला वाचवितो. धन्य आहे दधीची ! त्याचे दिव्य जीवन डोळ्यांसमोर ठेवा. आता उतू नका, मातू नका.”

“यज्ञ एव महान् धर्मः।
यज्ञ एव परा गतिः।।”

हे सूत्र ध्यानात धरा. हा दधीचीचा महिमा तुम्हाला सदैव जागृती देईल. त्याच्या पुण्याईने मधूनमधून महात्मे तुमच्यात उत्पन्न होतील. ज्या स्थानी दधीचीने तप केले, आपले जीवन शुद्ध केले, आणि शेवटची पूर्णाहुती दिली ते स्थान अतिपवित्र आहे. तेथील अणुरेणू पवित्र आहेत. तेथील भूमी यज्ञमय आहे. पुनःपुन्हा मुमुक्षू तेथे जातील, आपली जीवने निर्मळ करतील. जगाच्या कल्याणार्थ होमितील. दधीची ध्यानात धरा, संयमी व्हा, कर्तव्यकर्मे नीट पार पाडा. जा आता. तुमचे कल्याण असो !”

चराचराने प्रभूला वंदन केले. दधीचीच्या आश्रमस्थानावर कल्पवृक्षाच्या फुलांची वृष्टी झाली. सुरनर आपापल्या जागी गेले, स्वकर्माने सारे रंगून गेले.

दधीचींच्या त्या महान जीवन-यात्रेला शेकडो वर्षे झाली. साबरमतीच्या तीरावर दुधेश्वर म्हणून शंकराचे स्थान आहे, तीच काय ती त्या प्राचीन बलिदानाची स्मृती. परंतु या विसाव्या शतकात पुन्हा एक महात्मा तेथे आश्रम काढता झाला. जगातून यज्ञधर्म लोपला आहे. आसुरी वृत्ती बळावल्या आहेत. श्रमणारे मरत आहेत. श्रीमंतांची गंमत चालली आहे. स्पर्धेला ऊत आला आहे. जीवन म्हणजे काही सुखाची बेरीज, असेच समीकरण होऊ पाहत आहे. संयमाची आज टिंगल होत आहे. वासनांना ऊत आला आहे. जगात  ‘बळी तो कान पिळी’ हे तत्त्व रुढ होत आहे. माणसे पशू होत आहेत. त्यांना पशू केले जात आहे. राष्ट्रे एकमेकांच्या अंगावर धावत आहेत. खरी संस्कृती लोपली आहे. मानव्य मेले आहे. सद्विचार अस्तास गेला आहे. भूतमात्राचे कल्याण पाहण्याची वृत्ती नष्ट झाली आहे. जिकडे तिकडे भेद, मत्सर, द्वेष, कलह, युद्धे, जगात पाहाल तिकडे वणवे पेटले आहेत. हृदयात वणवे, बाहेर वणवे. युरोपातील राष्ट्रे मारणमरणात रंगली आहेत. काही महत्त्वाकांक्षी असुरांच्या महात्वाकांक्षेसाठी मानवांची कत्तल होत आहे. इकडे जपान तेच करीत आहे. दुस-याला लुटणे, गुलाम करणे हाच परमधर्म होऊन बसला आहे. मनुष्यरूपाने जो जास्तीत जास्त क्रूर असा पशू होऊ बघेल. त्याची पूजा होऊ लागली आहे.

जगात असुरी सत्ता पसरत आहेत. माणसांची मडकी केली जात आहेत. ना त्यांना कोणी जणू स्वतंत्र मन, स्वतंत्र बुद्धी. एकाचे सारे गुलाम. आणि या भरतभूमीत काय आहे ? ज्या भारताने येणा-या सर्वांस आधार दिला, सारे धर्म, सा-या संस्कृती, यांना जवळ घेऊन पोसले त्या भारतात काय आहे प्रकार ?

« PreviousChapter ListNext »