Bookstruck

आपण सारे भाऊ 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘आई, कृष्णनाथ अजून आला नाही?’

‘आलो. आई, चेंडू गेला गटारात. घाणीत गेला. दादा, तू उद्या दुसरा देशील आणून?’  कृष्णनाथाने प्रेमाने विचारले.

‘देईन हो. चला आता जेवायला. आज तुझी आवडती भाजी आहे. वाढ ना ग पाने.’

सगुणाबाईंना जेवायचे नव्हते. त्या पाटावर बसल्या होत्या. बाकीची सारी जेवायला बसली. रमाबाई वाढत होत्या.

‘जेव आता पोटभर.’

‘आई मागूनच्या भातावर दही आहे?’

‘दही आंबट असेल. दुपारचे विरजले आहे का ग? बघ जरा.’

‘नाही विरजले.’

‘त्याला ते थोडे आंबट दही वाढ व वर दूध वाढ; चालेल ना रे?’

‘हो आई. मी आज तुझ्याजवळ निजेन हां!’

‘बरे.’

जेवणे झाली. कृष्णनाथाने जरा पुस्तक वाचले. परंतु त्याचे डोळे मिटू लागले.

‘चल. नीज आता. पुरे अभ्यास. मराठी तिसरीचा तर अभ्यास.’

‘आई तिसरीचासुध्दा अभ्यास असतो. मास्तरांनी पाटीभर दिला आहे. सकाळी होईल सारा?’

‘होईल.’

सगुणाबाई  कृष्णनाथाला थोपटीत होत्या. तोंडाने गाणे म्हणत होत्या. कृष्णनाथ झोपला. हळूहळू घरातील सारीच झोपली. परंतु श्रीधरपंत व सगुणाबाई बोलतच होती. बाळाचे पुढे कसे होईल याचीच चिंता त्या बोलण्यात होती. शेवटी त्यांनीही झोप लागली. कृष्णनाथ आईच्या कुशीत होता.

« PreviousChapter ListNext »