Bookstruck

आपण सारे भाऊ 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कृष्णनाथ पुढे मोठा झाला म्हणजे शेतीवाडीत हिस्सेदार होणारच. सारी इस्टेट आपल्याला राहावी असे रमावैनीस वाटे. परंतु हा धाकटा दीर दूर कसा करायचा? त्याचे हाल करीत, छळ करीत; परंतु कृष्णनाथ अद्याप जिवंत होता. रमावैनीच्या मनात नाही नाही ते विचार येत. रघुनाथालासुध्दा त्यांनी तयार केले. दोघे नवराबायको कृष्णनाथाचा कांटा वाटेतून कसा दूर करायचा याचाच विचार रात्रंदिवस करीत होती.

त्या दिवशी रात्री बारा वाजून गेले होते. कृष्णनाथ झोपला होता. परंतु त्याच्या दादाला झोप नव्हती, त्याच्या वैनीला झोप नव्हती. कृष्णनाथाच्या मरणाचा विचार-या एका विचारात ते दुष्ट जोडपे मग्न होते.

‘आपल्या गडयाबरोबर त्याला शेतावर पाठवावे आणि विहिरीत दे ढकलून, सांगावे. द्यावे गडयाला शंभर रुपये. पैशाने सर्व काही होते. दे ढकलून, सांगावे. द्यावे गडयाला शंभर रुपये. पैशाने सर्व काही होते. दगडू सारे व्यवस्थित करील. आरडाओरड करील. विहिरीत बुडून मेला असे गावभर होईल.’

‘पापाला आज ना उद्या तोंड फुटते. हा दगडूच एखादे वेळेस बोलेल.’

‘ते त्याच्याच आंगलट येईल. कृष्णनाथाच्या अंगावरचे दागिने काढून यानेच त्याला पाण्यात ढकलले असे म्हणता येईल.’

‘तसे होते तर पंचनाम्याचे वेळेसच का नाही सांगितलेत, असे विचारतील.’

‘मग तुमच्या डोक्यातून काढा ना एखादा रामबाण उपाय. हा कारटा दूर झालाच पाहिजे. माझे बाळ जन्माला येण्यापूर्वी याला नष्ट करा!’

‘तुला का हे डोहाळे लागले आहेत?’

‘हो. कृष्णनाथ घरात असेल तर माझी धडगत नाही. डोळयांसमोर तो नको. त्याला विष द्या, विहिरीत लोटा, घरातून घालवा. काही करा!’

बागेतून फुलांचा सुगंध येत होता.
‘किती गोड वास!’  रघुनाथ म्हणाला.

‘मला नाही येत वास.’

‘ते बघ तारे किती सुंदर दिसत आहेत!’

« PreviousChapter ListNext »