Bookstruck

आपण सारे भाऊ 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तू नीज आता.’

‘साप घरात आल्यावर का झोप येईल?’

‘तू इतका हेवादावा का करतेस?’

‘माझ्या मुलाबाळांसाठी.’

‘आधी होऊ देत तर खरी.’

‘एकदा व्हायला लागली म्हणजे खंडीभर होतील. मग म्हणाल, इतकी कशाला?’

‘आईला नातू पाहायची इच्छा होती; परंतु नातवाला मांडीवर घ्यायला उद्या त्याची आजी नाही, कोडकौतुक करायला त्याचे आजोबा नाहीत.’

‘ती होती तोवर दिवस गेलेच नाहीत. तीं गेली आणि दिवस राहिले. जणू पोटी येणारे बाल त्यांना भीत होते! आता ही दुसरी भीती दूर करा!’

रघुनाथ खिडकीशी जाऊन उभा राहिला. दुष्ट रमा विचार करीत झोपी गेली.
असे दिवस जात होते आणि त्या गावात सर्कस आली. सर्कस कंपनी चांगल्यापैकी होती. रमा व रघुनाथ एके दिवशी खेळ पाहायला गेली. खेळ पाहून रात्री एक वाजता ती परत आली. बिचारा कृष्णनाथ! त्याला कोण दाखवणार खेळ? रडून रडून तो झोपी गेला होता.

रमा व रघुनाथ बोलत होती;
‘सर्कस चांगली होती; नाही? त्या लहान मुलांची कामे तर अप्रतिम झाली.’

‘ती लहान मुले पाहून तुम्हांस काय वाटले?’

‘कौतुक वाटले.’

‘माझ्या मनात निराळेच विचार आले.’

‘कोणते?’

« PreviousChapter ListNext »