Bookstruck

आपण सारे भाऊ 27

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘हे तुम्हांला सर्कशीचे पास घ्या. येत जा खेळ पाहायला.’

‘आभारी आहोत.’

‘अहो, आभार कसचे? आमचे कौतुक तरी कोण करतो? तुमच्यासारखा एकदाच गुणज्ञ भेटतो. बरे, बसा.’

मॅनेजरसाहेब मोटारीत बसून गेले. कृष्णनाथ मोटारीकडे पाहात होता.

‘तुला का मोटारीत बसायचे आहे?’

‘दादा, तू घे ना मोटार. मला आवडते मोटार.’

‘आपण एक दिवस जाऊ हो बसून. ते नेणार आहेत आपणाला फिरायला.’

‘कोण रे ते दादा?’

‘सर्कशीचे मॅनेजर.’

‘ते चाबूक मारतात ना? सिंह. वाघसुध्दा गडबड करीत नाहीत. होय ना दादा? आपण कधी जायचे सर्कस बघायला?’

‘हे बघ त्यांनी पास दिले आहेत. रोज जाऊ.’

‘ओहो मजाच!’

आणि रात्री कृष्णनाथ सर्कस बघून आला. दादा किती चांगला असे त्याला वाटले. दुस-या दिवशी दादाने त्याच्यासाठी नवीन कपडे शिवायला टाकले. कृष्णनाथला नवीन सुंदर टोपी मिळाली.

‘या टोपीत तू खरेच सुंदर दिसतोस.’  दादा म्हणाला.

‘दादा, मी तुझा ना?’

‘होय हो. काढ ती टोपी. कोणाची दृष्टसुध्दा पडेल.’
कृष्णनाथ उडया मारीत आपल्या खोलीत गेला. त्याने ती टोपी कितीदा डोक्यावर चढविली, कितीदा काढली. आज त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. दादा-वैनी किती चांगली, असे म्हणत होता.

« PreviousChapter ListNext »