Bookstruck

आपण सारे भाऊ 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मी मॅनेजर आहे. सिंह, वाघ मला भितात.’

‘तुमच्या हातात चाबूक असतो; होय ना?’

‘तुला सारे माहित आहे तर. गप्प बस. चाबूक नको ना?’

‘दादा कोठे आहे?’

‘दादा घरी गेला. तुला सर्कशीत शिकण्यासाठी त्याने पाठविले आहे. माझ्या ताब्यात आहेस तू. तुला काम शिकवीन. लोक तुझी वाहवा करतील. तुला बक्षीस देतील. तुझे फोटो काढतील. नीट काम शीक.

‘मला दादाकडे पाठवा. दादा, दादा, माझा दादा-

‘गप्प बसतोस की नाही? थोबाड फोडीन. गप्प. अगदी हूं की चूं नये होता कामा. सांगेन तसे ऐकले पाहिजे. येथे लाड नाहीत. बसून रहा नीट.

कृष्णनाथ घाबरला, भ्याला. तो सारखे मागे पाहत होता. परंतु ना मोटार, ना काही. आता सायंकाळ झाली. अंधार पडू लागला. कोठे जाणार ही मोटार, कोठे थांबणार? सुरगाव दूर राहिले.

‘दादा!’  एकदम कृष्णनाथाने दीनवाणी हाक मारली.

‘दादाला विसर आता. आता सांगेन ते काम. नाही नीट केलेस तर चाबूक बसतील. घरचे लाड नाहीत येथे. किती दिवस दादा तुला पोसणार? कोण रे तू दादाचा?’

‘दादाचा भाऊ.’

‘सख्खा भाऊ?’

‘हो.’

‘गप्पा मारतोस का? दादा केवढा आणि तू केवढा! तुमच्या दोघांत इतके अंतर? त्यांनी तुला अनाथाला इतके दिवस सांभाळले. तुला लाज वाटायला हवी फुकट खायची. आता काम शीक व पगार मिळव. त्यातून दादालाही पाठवीत जा. मीच पाठवीन.!
‘तुम्ही खरेच का मला सर्कशीत नेणार?’

‘होय.’

« PreviousChapter ListNext »