Bookstruck

आपण सारे भाऊ 37

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रमा गादीवर पडली. पाळण्यात अरुण झोपला होता. रघुनाथ निघून गेला. विचार करीत निघून गेला. त्या दिवशी रघुनाथ घरी नव्हता. आणि रमा एकाएकी पडू लागली. मोठयाने रडू लागली. शेजारच्या बायका आल्या.
‘काय झाले रमाबाई?’

‘काय सांगू तरी! अरेरे! कसा सोन्यासारखा होता. गेला, कृष्णनाथ गेला हो!’

‘कधी कळले?’

‘आज पत्र आले. एकाएकी गेला हो.’

‘त्या दिवशी मोटारीतून गेला. नवी टोपी घालून गेला. खरेच कसा दिसे!’

‘रडू नका रमाबाई , तुम्ही नुकत्या बाळतंपरातून उठलेल्या. मनाला लावून नका घेऊ. देवाची ईच्छा. या का स्वाधीनच्या गोष्टी असतात? उठा, तो अरुण रडतो आहे पाळण्यात.’

शेजारणी गेल्या. रमाबाई दु:खीकष्टी दिसत होत्या. आज भाताचे दोन घासच त्यांनी खाल्ले. रघुनाथ दोन दिशी आला. रमाबाईंनी सारे नाटक सांगितले.

‘तुम्हीही बाहेर नीट बतावणी करा, बावळटासारखे नका करु.’  असे त्यांनी बजावले.

‘अग, पण तो परत आला तर?’

‘पुढचे पुढे पाहू. आज नको त्याचा विचार. नदीत बुडून मेला. पुरात वाहून गेला, असे पसरवू. आला परत तर कोठै तरी तीराला लागला, वाचला असे म्हणू, अहो, बुध्दी असली म्हणजे काही अशक्य नाही. अक्कल लागते.’

‘तू शिकवीत जा, तू माझी गुरु!’

आनंदात दिवस जात होते. अरुण वाढत होता. त्याचे कोडकौतुक किती केले जात होते, त्याला सीमा नव्हती. एक बाई  त्याला गाडीत घालून फिरायला नेई. रघुनाथ व रमाबाईही मागून जात. वाटेत गाडी थांबवून रमा त्याला जरा जवळ घेई व मुका घेऊन गाडीत ठेवी.

« PreviousChapter ListNext »