Bookstruck

आपण सारे भाऊ 39

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बाळ आईबापांकडे बघत होता. परंतु पुन्हा त्याला ग्लानी आली होती. आळीपाळीने ती थोडी झोप घेत, परंतु शेवटी औषधोपचार यशस्वी झाले नाहीत. अरुण आईबापांस सोडून गेला. नवीन बाळ आल्यावर आपल्यावरचे प्रेम कमी होईल म्हणून का अरुण निघून गेला? आईला इस्टटीत वारसदार नकोत. तिच्या प्रेमातही कशाला मी वाटेकरी होऊ?  येणा-या बाळालाच सारे प्रेम लुटू दे, असे का अरुणाच्या आत्म्यास वाटत होते? की आपणही पुढे इस्टेटीत हिस्सेदार होऊ, आईला जास्त कशाला मुले? एकच असू दे. दुसरा येत आहे, तर मला अस्तास जाऊ दे, असे का त्याच्या अंतरात्म्यास वाटले?  काही असो. आपले हे सारे वेडे तर्क. ताप आला नि अरुण गेला ही सत्यता मात्र स्पष्ट दिसत होती.

काही दिवस दु:खाचे गेले. परंतु उन्हाळा संपून पुन्हा पावसाळा सुरु झाला होता. सृष्टी हिरवीगार दिसू लागली होती. शेतेभाते हिरवीगार दिसू लागली होती आणि रमाच्या घरीही पुन्हा पाळणा हलू लागला होता.

‘याचे नाव तुझ्या आवडीचे ठेव. अरुण नाव मानवले नाही.’

‘तुम्ही असे मनाला लावून घेऊ नका. मी अनंतप्रसवा आहे. घरात बाळ नाही असे होणार नाही. माझी पुण्याई भरपूर आहे.’

‘काय ठेवणार नाव?’

‘अनंत.’

‘सुरेख. खरेच सुरेख. ज्याला अंत नाही तो अनंत हा बाळ तरी शतायुषी होवो!’

‘मन चिंती ते वैरी न चिंती. तुम्हांना डोळयांसमोर सारखे मरण दिसते. तुमच्या मनाला जरा शिकवा!’

‘तू माझी गुरु.’

त्या बाळाचे नाव अनंत ठेवले. दिवसेंदिवस वाढू लागला बाळ. अंगावर कसे बाळसे होते! रमणीय मनोहर मूर्ती. होता होता वर्षा दोन वर्षांचा बाळ झाला. एके दिवशी रमा नि रघुनाथ बाळाला घेऊन फिरायला गेली होती. एका पारशीणबाईने बाळाला पाहिले. तिने त्याला जवळ घेतले.

‘किती सुंदर तुमचा मुलगा!’  ती म्हणाली.

पुन्हा पुन्हा तिने बाळाचे मुके घेतले व शेवटी म्हणाली, ‘हे पंचवीस रुपये घ्या; या बाळाला त्याचे काही तरी करा.’
आता सोन्यासारखा बाळ! परंतु रमाला पुन्हा दिवस गेले आणि इकडे हा अनंता आजारी पडला! आईबापांच्या पोटात धस्स झाले. शेवटी व्हायचे ते झाले. रमाच्या मांडीवर अनंता अनंत निद्रेशी एकरुप झाला. अरेरे! असे चालले होते. मुले जन्मत होती. दुसरे येईतो पहिले जाई. त्या घराला एकाहून अधिक मुले का मानवत नव्हती? प्रभूला माहीत!

« PreviousChapter ListNext »