Bookstruck

आपण सारे भाऊ 46

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘कृष्णनाथ, हा घे कोको.’ विमल म्हणाली.
कोको पिऊन पांघरुण घेऊन तो पडला होता. माधवराव व विमल जेवायला गेली. कृष्णनाथाचे हृदय भरुन आले होते. थोडया वेळयाने तो उठून अंथरुणात बसला. त्याने हात जोडले होते. डोळे मिटले होते. तो का प्रार्थना करीत होता? ध्रुवाच्या मूर्तीप्रमाणे तो दिसत होता.

‘पाय नको वाजवू; हळूच चल.’  माधवराव विमलला म्हणाले.

‘कृष्णनाथ निजला असेल; होय ना बाबा?’  तिने विचारले.

दोघे वर आली. तो तेथे गंभीर दृश्य! माधवराव शांतपणे उभे होते. जवळ विमल उभी होती. परंतु तिच्याने राहवेना.  ती एकदम जवळ जाऊन म्हणाली, काय रे कृष्णनाथ, काय करतो आहेस? कृष्णनाथने डोळै उघडले. तो पांघरुण घेऊन पडून राहिला.
‘तू देवाची प्रार्थना करीत होतास? तिने विचारले.’

‘हो!’

‘तू रोज प्रार्थना करतोस?’

‘नाही. माझी आई नि बाबा फार आजारी होती. त्या दिवशी रात्री देवाला हात जोडले होते. त्यानंतर आज!’

‘तुला आता बरे वाटते का?’

‘हो; झोप येईल असे वाटते!’

‘झोप तर.’

विमल गेली. माधवराव दिवाणखान्यात फे-या घालीत होते. त्यांच्या दिवाणखान्यात ध्रुवनारायणाची मोठी तसबीर होती. फे-या घालता घालता एकदम त्यांचे त्या तसबिरीकडे ध्यान गेले. किती वर्षे ती तसबीर तेथे होती; परंतु त्या तसबिरीतील अर्थ त्यांना आज कळला. तेथे ते उभे राहिले. त्यांनी प्रणाम केला.

काही दिवसांनी कृष्णनाथ बरा झाला. त्याची प्रकृतीही सुधारली. तो त्या घरात घरच्यासारखा झाला; हसू खेळू लागला. त्याच्यामुळे त्या घराला अधिकच शोभा आली. कृष्णनाथाचे जीवन शतरंगांनी फुलू लागले.

« PreviousChapter ListNext »