Bookstruck

आपण सारे भाऊ 49

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तुमच्या इच्छेबाहेर मी नाही. तुम्ही सांगाल ते माझ्या ब-याचेच असणार!’

‘मी संस्थेच्या चालकांकडे पत्र पाठविले आहे. नवीन विद्यार्थी घेण्याची मुदत संपली आहे. परंतु त्यांना गळ घातली आहे. कृष्णनाथाचे पुष्कळ वर्णन केले आहे.’

‘बाबा, कृष्णनाथाला पोचवायला तुम्ही जाल?’

‘हो, पहिल्याने नको का जायला?’

‘मी येऊ तुमच्याबरोबर? तो सुंदर गाव मीही पाहीन.’

‘आधी उत्तर काय येते ते पाहू. मग ठरवू.’

शेवटी एके दिवशी उत्तर आले. प्रवेश मिळाला. कृष्णनाथाची तयारी होऊ लागली. परंतु विमलला एकाएकी ताप आला. आता काय करायचे?’

‘कृष्णनाथ, तू एकटा जाशील? जा बाळ. विमलला बरे वाटले म्हणजे तिला घेऊनच येईन, नाही तर एकटा येऊन जाईन. कारण तिकडे या वेळेस पाऊस फार असतो. विमलच्या प्रकृतीला कदाचित् सोसायचा नाही. परंतु तू दिवस फुकट नको दवडूस!’

‘विमलला आजारी सोडून मी कसा जाऊ?’

‘ती तशी फार आजारी नाही. कमीजास्त वाटले तर तुला तार करीन हो. तू उद्या नीघ. माझे ऐक. त्यांनी प्रवेशाची मुदत टाळल्यावरही प्रवेश दिला. आता आपण गेले पाहिजे. उशीर करणे बरे नाही.’

कृष्णनाथ जायला निघाला.
‘विमल, लवकरच बरी हो. मला भेटायला ये. भेटायला न आलीस तर पत्र पाठव. बाबांची आज्ञा म्हणून मी जात आहे. नाही तर येथे राहून तुझी सेवा केली असती. तुझ्या उशाजवळ फुले ठेवली असती.

‘कृष्णनाथ, तू एकटा जाणार? जप हो. पुन्हा कोणी नाही तर नेईल पकडून. बाबा, पुन्हा कोणी नेईल का हो याला सर्कशीत?’ विमल हसून म्हणाली.

« PreviousChapter ListNext »