Bookstruck

आपण सारे भाऊ 53

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मधली सुटी झाली होती. शारदाश्रमातील मुले अल्पोपाहारासाठी आली. कृष्णनाथही गेला. आणि चालक त्याला म्हणाले :
‘चल माझ्याबरोबर. कपडे घाल. शाळेचा दाखला घे. चौथीची पुस्तके घे. एखादी वही घे नि चल.’

कृष्णनाथ निघाला. शाळेची लांबच लांब इमारत होती. समोर होती. चालकांबरोबर कृष्णनाथ शाळेच्या कचेरीत गेला. रीतसर त्याचे नाव दाखल करण्यात आले. शिपायाने त्याला चौथीचा वर्ग दाखविला. कृष्णनाथाने वर्गात प्रवेश केला. सारी मुले त्याच्याकडे बघू लागली.

‘बस बाळ.’  शिक्षक म्हणाले.

कृष्णनाथ शेजारच्या मुलाच्या पुस्तकात पाहू लागला. तो मराठीचा तास होता. परंतु शिक्षक कृष्णनाथाजवळच बोलू लागले.
‘तुझे नाव काय?’

‘कृष्णनाथ.’

‘मराठीत किती मार्क मिळाले होते?’

‘७६.’

‘अरे वा! हुशार दिसतोस. एखादी कविता म्हणतोस का? म्हण.

कृष्णनाथाने एक कविता म्हटली :
हे हिंदभूमी तुझिया | चरणांस हा प्रणाम ।। धृ ।।
जरि आज दीन बध्द | होशील मुक्त शीघ्र
होईल सर्व जगता | ते व नाम गे ललाम ।। हे. ।।
तव पुत्र सान थोर | पुरुषार्थ दिव्य करुनी
झणि देख आणितील | तव जीवनात राम ।। हे. ।।
सेवा तुझीच करुन | मम देह हा झिजू दे
हा एक हेतु जीवी | नाहीच अन्य काम ।। हे. ।।
कृष्णनाथाची कविता संपली.
‘कोठे शिकलास हे गाणे?’

‘आगगाडीत.’

‘आगगाडीत शिकलास?’

‘हो. माझ्याजवळ कॉलेजमध्ये जाणारा एक विद्यार्थी बसला होता. तो हे गाणे म्हणत होता. त्याचा आवाज फार गोड होता. मला ते गाणे आवडले. मी त्याच्याजवळ मागितले. त्याने टिपून दिले. मी येता येता पाठ केले.’

‘शाबास! तू पुढे मोठा होशील!’

« PreviousChapter ListNext »