Bookstruck

आपण सारे भाऊ 66

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मनाचे, सदसद्विवेक बुध्दीचे. अन्यायासमोर मी नमणार नाही, पाशवी व जुलमी सत्तेला प्रणाम करणार नाही. ती जुलमी सत्ता मला चिरडील, चिरडो. तरी माझे आत्मिक स्वातंत्र्य मी राखले. हेच एक खरे स्वातंत्र्य. आम्ही नि:शस्त्र असू तरी आसुरी सत्तेचे वटहुकूम मुकाटयाने आम्ही मानणार नाही. हाती शस्त्रे असली तरी काय? पोलंड सशस्त्र होता; परंतु काय दशा झाली? त्यांनी विरोध केला यांतच पुरुषार्थ!

‘कृष्णनाथ, तू मोठया गोष्टी बोलत आहेस.’

‘तुम्ही रागावलेत?’

‘नाही रे, रागावेन कसा? तुझे कौतुक करीत आहे. असाच बुध्दिवान हो, तत्त्वज्ञानी शास्त्रज्ञ हो. बी.एस्सीत पहिला ये!’

मधून मधून असे संवाद होत. आणि ४१ साली तो पुण्याल परत आला. विमल मॅट्रिक पास झाली होती. परंतु वडिलांची प्रकृती बरी नव्हती. ती त्यांच्याजवळच राहिली.

कृष्णनाथाचे ज्यूनिअरचे वर्ष होते. जरी असली तरी परीक्षा मुख्य विषयांची नव्हती आणि त्याचे लक्ष ओढून घ्यायला एक नवीन संघटना सुरु झाली होती. महाराष्ट्रात नवीन पायावर राष्ट्रसेवादलाची संघटना उभी करण्यात आली. किती दिवसांपासून अशी संघटना असावी असे कृष्णनाथाला वाटे. तो त्या सेवादलाच्या कार्यात सर्व शक्तिनिशी सामील झाला. ध्यानी-मनी-स्वप्नी त्याला दल दिसे; त्याची प्रतिभाही जागी झाली. तो कवी झाला. सेवादलाची गाणी निर्मू लागला. त्याचे सारे जीवनच वास्तविक काव्यमय होते! त्याचे जीवनच प्रज्वलित प्रतिभा होती!

« PreviousChapter ListNext »