Bookstruck

आपण सारे भाऊ 79

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘परंतु विमल काय म्हणेल? खरे म्हणजे ही तिची सारी इस्टेट. तिच्या इस्टेटीची मी माझ्या मनात अशी विल्हेवाट लावीत आहे. ती जर या त्यागाला तयार नसेल, तर काय करायचे?’

‘तिला तू पटव.’

‘न पटले तर? आम्ही मनाने एकमेकांपासून दूर जाऊ. मी शेतक-यांना जोडायला जाईन नि विमलला तोडायचा प्रसंग यायचा. मनात हे विचार चालले होते. काल रात्री ते श्रीमंत जमीनदार मला एकदम म्हणाले. ‘तुम्ही तरी तुमची जमीन एकदम टाकाल देऊन? - मी तेव्हा उत्तर दिले की, ‘सुटल्यावर आधी हेच मी करणार आहे. कायदा होईपर्यंत तरी वाट कशाला पाहू? तेव्हा मला त्यांनी मोठा टोमणा मारला!’

‘मी जवळच होतो. ‘मोठे देशबंधू दासच की नाही एका क्षणात सारे तोडायला!’  असे तुला ते म्हणाले. परंतु कृष्णनाथ, हे वाद इतके मनाला लावून घेऊ नयेत.’

‘त्रिंबक, आपण का केवळ वादासाठी वाद करीत असतो?’

'त्याचा का जीवनाशी संबंध नसतो?’

‘काही वाद बौध्दिक आनंदासाठी असतात. काही गोष्टी स्पष्ट व्हाव्यात म्हणून असतात.'

‘परंतु ज्या गोष्टी स्पष्ट होतात त्या जीवनात दिसायला नकोत?'

‘कृष्णनाथ, जीवन हे उडया मारीत जात नाही. आपण मनाने खूप दूरचे पाहतो, म्हणून का लगेच तसे होते? अर्थात् काही महात्मे असे असतील की ज्यांच्या मनात विचार येताच हातून तसा लगेच आचारही होतो. आणि म्हणून म्हणतात की, ज्यांच्या विचारांत नि आचारात क्षणाचेही अंतर नाही असा एक परमेश्वरच असू शकेल. त्याची कृती म्हणजेच विचार, त्याचा विचार म्हणजेच कृती!’

‘ते बायबलात वाक्य आहे ना, ‘प्रभू म्हणाला, सर्वत्र प्रकाश पडू दे,’ आणि लगेच सर्वत्र प्रकाश आला!

‘सुंदर वाक्य आणि कृष्णनाथ, तुझी विमलही तिकडे असेच काही विचार करीत नसेल कशावरुन? तू तिला येथून पत्र लिहू शकशील. हे विचार लिहायला हरकत नाही. पत्रद्वारा एकमेकांची मने तयार करा. तुरुंग हे खरोखरची राष्ट्रीय शाळा आहे. घरी आपण कधी जे विचार मनात आणीत नाही, ते येथे सुचतात.’

‘आणि आपल्या या तुरुंगात तरी ज्ञानसत्रच आहे. वेदांताचा तास आहेच. मार्क्सवादाचा तास आहेच. उर्दू, बंगालीचे तास आहेतच. गांधीवाद नि समाजवाद यांतील साम्य नि विरोध यांवर प्रवचने आहेतच. आणि या बौध्दिक खुराकाबरोबर खेळ आहेत, सामुदायिक कवाईत आहे. सर्वांगसुंदर व्यायाम आहे, मल्लखांब आहे, आनंद आहे!’

« PreviousChapter ListNext »