Bookstruck

आपण सारे भाऊ 94

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सिंधुला बरे वाटू लागले आणि पुन्हा यात्रेकरु निघाले!

स्वराज्यवाडीचे यात्रेकरु.

एके दिवशी इंद्रपूरच्या स्टेशनावर ती उतरली. पहाटेची वेळ होती. थंडी खूप होती. मुले थरथरत होती.

‘त्या झाडाखाली काटक्या पानपाचोळा तरी पेटवा! रमा म्हणाली. रघुनाथ गेला. त्याने त्या झाडाखाली शेकोटी पेटविली. रमा मुलांना घेऊन तेथे आली. तेथे एका घोंगडीवर मुले निजली. थोडेफार पांघरुण होते. शेकोटीची ऊब होती. रघुनाथ एक लाकूड घेऊन आला. ते चांगले पेटले लहान चंपू आईच्या पदराखाली मांडीवर होती.

‘रमा, पापे मेल्यानंतर फळतात असे म्हणतात. आपली पापे या जन्मीच फळली! तुझे मी ऐकले नसते तर किती छान झाले असते! रमा, तू मला दुर्बुध्दी शिकवलीस!’

‘परंतु तुम्ही मला सद्बुध्दी का नाही शिकवलीत?’  तुमच्या सद्बुध्दीपेक्षा माझी दुर्बुध्दी प्रभावी का ठरावी? रघुनाथ, जाऊ दे! सर्व पापांचा भार शिरावर घ्यायला रमा तयार आहे! ही बाळे आज थंडीत अनाथाप्रमाणे पडली आहेत, त्याला केवळ मीच ना कारण?’

‘रमा मीही पापीच आहे! मी जुगार खेळलो नसतो, दारुत लोळलो नसतो तर? तुलासुध्दा मी मारहाण केली. अरेरे! तुला कोठल्या तोंडाने मी नावे ठेवू?’

‘मी कृष्णनाथाला निर्दयपणे मारीत असे. सासूबाई, मामंजी यांनी माझ्या ओटीत कृष्णनाथाला घातले; परंतु मी काय केले? त्याचे हालहाल केले! कृष्णनाथ, बाळ, कोठे रे तू असशील? का आईकडे गेला असशील? जेथे असशील तेथून तुझ्या या पापी वैनीला क्षमा कर!’

‘खरेच. कृष्णनाथ पुन्हा भेटेल का? माझा गोरागोमटा, गोड भाऊ! कसा दिसे! कसा हसे! आई म्हणायची, राजस सुंदर मदनाचा पुतळा तसा माझा बाळ आहे!’

‘आणि अशा फुलावर आपण निखारे ओतले! हरिणाच्या पाडसाला वणव्यांत लोटले! बाळाला सर्कशीत धाडले! कृष्णनाथ, बाळ! आमची पापे कशी फिटतील?’

ते कोण तेथे उभे आहे? हा तर कृष्णनाथ. तो कसा तेथे आला? आज विमल यायची होती या गाडीने. म्हणून तो शेतावरचा टांगा घेऊन आला होता. परंतु विमल आली नाही तो जरा हिरमुसला झाला होता. त्यालाही थंडी लागत होती. त्या शेकोटीकडे तो येत होता. परंतु ‘कृष्णनाथ, बाळ’ असे शब्द ऐकून तो चपापला! तो ती बोलणी ऐकत होता. शेवटी तो पुढे आला.

‘तुम्हांला कोठे जायचे आहे?’ त्याने विचारले.

‘आम्हाला त्या अवलियाकडे जायचे आहे. येथे कोणी गरिबांची वसाहत वसविली आहे ना?

« PreviousChapter ListNext »