Bookstruck

दुर्दैवी 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''गावच्या कल्याणाच्या मी सार्‍या गोष्टी करीन. गायराने नव्हती. ती तर आता झाली. गुरांना चारा आता भरपूर होईल. सारंगपूर सुखी समाधानी असावे, निरोगी असावे, हेच माझे ध्येय आहे....'' इतक्यात कोणी तरी ओरडले,

''धान्याचे काय? सार्‍या धान्याचा मक्ता तुम्ही घेतला आहे. गावाला धान्य तुम्ही पुरवता. या वर्षी सारे सडके धान्य खावे लागत आहे. तो आटा कडू लागतो. तोंडात कसा घालायचा? गाव का आशेने निरोगी राहील? तुमचे सत्कारसमारंभ होत आहेत. तुमच्या मेजवान्या चालल्या आहेत. आम्हांला पैसे देऊनही विषासारखे अन्न खावे लागत आहे. त्याचे काय करणार? चांगला आटा देणार का?''

''देणार का चांगला आटा? बोला.''

''बोला ना हो. आता का गप्प?''

रंगराव रागाने लाल झाला. तो म्हणाला;

''तुमची तोंडे थांबली म्हणजे मी बोलतो. मी का मुद्दाम वाईट धान्य आणले? परप्रांतीय व्यापार्‍यांनी मला फसविले. मी काय करणार? आता हा दळलेला आटा का पुन्हा नीट करता येणार आहे? तुम्ही या आटयाचे मला गहू करून द्या. मी तुम्हांला नवीन गहू देतो. उगीच काही तरी बोलू नका. आणि जे धान्य आहे ते सुधारण्याचा प्रयोग आम्ही चालवला आहे. तुम्हांला वाईट खावे लागते याचा मला काही आनंद नाही वाटत.''

''या आजच्या संभाषणावरून तुम्हांला किती दु:ख होत आहे ते दिसून येतच आहे.'' लोक ओरडले. इतक्यात त्या गर्दीतून कोणी तरी एक अपरिचित मनुष्य दिवाणखान्याच्या दाराजवळ गेला. तो आज जाऊ पाहात होता. परंतु त्याला परवानगी मिळेना.

''अहो, त्या अध्यक्षांना मला भेटायचे आहे.''

''आत्ता नाही. ही का भेटायची वेळ? व्हा चालते.''

« PreviousChapter ListNext »