Bookstruck

दुर्दैवी 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तुम्ही का वेडे आहात?''

''होय; तुमच्यासाठी मी वेडा झालो आहे. तुम्ही या गावात राहा. माझा व्यापार चालवा. माझे सहकारी बना. मी एकटा आहे. कित्येक वर्षे मी एकटयाने काढली. एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे अमेरिकेत जाण्यापेक्षा अधिक मोलाचे नाही का? विचार करा. तुमच्या डोळयांत सहानुभूती येत आहे. तुमचे ओठ मला नाही म्हणू शकणार नाहीत. चला.''

रंगरावाने त्या पाहुण्याचा हात धरला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले.

''ठीक. न्या मला तुमच्याकडे. काही दिवस माझी अमेरिका म्हणजे तुम्हीच, असे समजेन; परंतु तुम्ही मला कंटाळाल.''

''शक्य नाही. आपले पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत. एरवी अशी ओढ मला लागली नसती. काल रात्री तुम्हांला पाहिले. तुमच्याशी दोन शब्द बोललो. मी गेलो, परंतु रात्रभर मला झोप आली नाही. या गोष्टी का सहजासहजी होतात? यांत का काही अदृष्ट नाही? चला. तुमचे माझे जणू लग्न लागले आहे! चला.''

घोडयाचा लगाम धरून रंगराव चालू लागला. तो पाहुणाही बरोबर निघाला. ते गावांत आले. लोक त्यांच्याकडे कुतुहलाने बघत होते. कोणी नगरपालिकेच्या अध्यक्षास नमस्कार करीत होते. शेवटी दोघे एका बंगल्यासमोर येऊन उभे राहिले. एका नोकराने धावत येऊन घोडा नेला.

''चला आत.'' रंगराव म्हणाले.
''चला.'' पाहुणा म्हणाला.
ते दोघे आत गेले. एका सुंदर दिवाणखान्यात बसले. कोणी कोणाशी बोलत नव्हते. थोडया वेळाने रंगरावांनी बोलण्यास आरंभ केला.

''तुमचे नाव काय?''
''माझे नाव हेमंत..... तुम्हांला वसंत आवडते वाटते?''
''तुमचे जे नाव असेल ते मला आवडेल. हेमंत. छान आहे नाव.''
''तुमचे नाव काय?''
''रंगराव.''

« PreviousChapter ListNext »