Bookstruck

दुर्दैवी 24

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''ही दूरची हाक वाटते. मी तुम्हांला भाऊ म्हणू?''

''म्हणा, म्हणा, आपण जणू भाऊ. जाऊ आता, हेमंत?''

''जा, भाऊ.''

रंगराव गेले. हेमंत काम बघू लागला.

दुपार झाली. हेमंत घरी गेला. त्याने स्नान केले. रंगरावांच्या पंक्तीला तो जेवला.

''हेमंत, तू उद्या चांगले कपडे शिवायला दे. लक्षाधीशाचा भाऊ शोभायला हवास.''

''परंतु बाजारांत धूळ उडणार, कपडे खराब होणार.''

''होऊ देत खराब. मी सांगतो ते ऐक.''

''बरे,भाऊ; तुमची इच्छा.''

तिसर्‍या प्रहरी हेमंत पुन्हा कचेरीत काम करीत बसला. नोकरचाकरांशी नवीन ओळखी तो करून घेत होता. त्याची आनंदी मुद्रा, गोड बोलणे, प्रेमळ निर्मळ डोळे यांचा सर्वांवर अनुकूल परिणाम होत होता.

तिकडे माया आणि हेमा काम करीत होत्या. दुपारचे जेवण त्यांनी त्या खानावळीतच केले. जेवणाचे पैसे काम करून त्यांनी चुकते केले. भांडी वगैरे घासून हेमा वरती आली.

''बस हेमा. दमलीस.'' माया म्हणाली.

''आई, त्या गृहस्थांकडे कधी जायचे? तू एकटी त्यांना भेटायला जाणार की मीही तुझ्याबरोबर?''

''हेमा, तिसरे प्रहरी मी एक चिठ्ठी लिहून देईन. ती तू त्यांना नेऊन दे.''

''मला त्यांचे घर सापडेल का?''

« PreviousChapter ListNext »