Bookstruck

दुर्दैवी 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तू येथे एक घर भाडयाने घे. मी पैसे देईन. त्या घरात उद्यापासून तुम्ही दोघे राहा. बागेत फिरायला येत जा. मीही येत जाईन. आपण हळूहळू ओळख करू आणि पुढे तुझे-माझे प्रेम जडले आहे असे दाखवू. एके दिवशी पुन्हा आपला विवाह आपण लावून घेऊ. मग तू माझी धर्मपत्नी म्हणून माझ्या घरी येशील. तुझ्याबरोबर हेमाही येईल. तिचे नीट संगोपन करू. ती शिकेल. शिकवायला मास्तर ठेवू. सारे छान होईल.''

''परंतु तू तिचा जन्मदाता हे तिला कसे कळणार?''

''सध्या सारे अज्ञातच राहू दे. आपली मुलगी आपल्याजवळ, हा माझा आनंद कोण हिरावून नेणार आहे? माझा आनंद जगाला जरी कळला नाही, तरी मी त्यात मस्त राहीन. मग कसे करायचे? तुला पसंत आहे ना?''

''पसंत आहे. मी आता जाते. उद्या लहानसे घर बघते.''

''नगरपालिकेच्या बागेजवळ एक घर भाडयाने द्यायचे आहे. उद्या ते ठरव. हे पैसे घे. खानावळवाल्याचे दे. जेवलात की नाही?''

''जेवलो होतो. जाते हं मी.''

ती गेली. थोडया वेळाने तोही उठला. हळूहळू तो जात होता. किती तरी विचार त्याच्या हृदयांत थैमान घालीत होते. माझा बंगला गजबजणार. माझी हेमा घरात देवतेप्रमाणे शोभणार, मी तिला काही कमी पडू देणार नाही. मी तिला दुपारी द्राक्षे दिली. परंतु आपला पिता आपणास द्राक्षे देत आहे ही तिला कोठून असणार कल्पना? मला आपली मुलगी जवळ आहे याचा आनंद वाटेल! परंतु आपला जन्मदाता आपल्या केसांवरून हात फिरवीत आहे ही भावना तिला नसणार. गरीब बिचारी. दुसर्‍या आडनावाने माझ्या घरात राहणार. तिला का परकेपणा वाटेल? संकोच वाटेल? आधार वाटेल? परंतु आई तर तिचीच आहे. ती आनंदाने राहील. हसेल, खेळेल, शिकेल. मोठया सुसंस्कृत घराण्यात मी तिला देईन. तिचा संसार सुखाचा होईल. हेमा. सुंदर मुलगी. आज त्या साध्या मळकट कपडयातही ती गोड दिसत होती. मग सुंदर रेशमी पातळात ती किती खुलून दिसेल? तिला मोत्यांची कुडी आणीन. सोन्याच्या बांगडया करीन. गळयात मोत्यांचा कंठा घालीन. माझी हेमा जणू स्वर्गातील रंभा होईल. किती वर्षांनी आज हृदय फुलून येत आहे; भरून येत आहे! असे विचार करीत रंगराव घरी गेला.

« PreviousChapter ListNext »