Bookstruck

दुर्दैवी 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''फिरायला नाही का जात कधी?''

''एखादे वेळेस जाते. येथे अजून ओळख नाही कोणाशी. आईला तितकेसे बरेही नसते.''

''तुमच्या आईची प्रकृती का बरे ठीक नाही?''

अनेक आपत्तींतून तिला जावे लागले आहे. भाऊंचे तिच्यावर प्रेम आहे. परंतु आई फार दिवस राहील असे मला वाटत नाही.''

''असे नका म्हणू. विश्रांती नि उपचार यांनी त्यांना बरे वाटेल. आपण तशी आशा करू या: प्रार्थना करू या.''

''मी जाते.''

हेमा गेली. हेमंत तिच्याकडे पाहात होता. आणि तिनेही मागे वळून पाहिले. दोघांची दृष्टी एकत्र झाली. परंतु पुन्हा मागे न बघता हेमा झपाटयाने निघून गेली.

हेमंत गावात सर्वांचा आवडता होऊ लागला. तो गोड बोलणारा होता. कधीही कोणाला टाकून बोलत नसे. तो संयमी होता. खेडयापाडयांतून शेतकरी येत. धान्याच्या गाडया घेऊन येत. त्यांच्याशी तो सौजन्याने बोले. त्यांना भाकर वगैरे खाण्यासाठी त्याने सुरेखशी छायेची जागा केली. बैलांना पाणी पिण्याची नवीन सोय त्याने केली. त्यांना तो फसवीत नसे. मापात अफरातफर करू देत नसे. मापाला बोट, पसा लावू देत नसे. शेतकरी त्याच्यावर खूष असत. ते आपली सुखदु:खे त्याच्याजवळ सांगत. ते त्याचा सल्ला घेत. गावात भांडणतंटा असला तर ते त्याला मध्यस्थी करायला बोलावीत. त्याचा निर्णय सारेजण मानीत. तो त्यांच्या लग्नांना जायचा, सोयरिकी जोडायचा. खर्चाला त्यांना पैसा द्यायचा. जणू तो देवमाणूस झाला.

« PreviousChapter ListNext »