Bookstruck

दुर्दैवी 42

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''बरे तर, सांगा इतिहास.''

हेमंत आत आला. तो तेथे रंगराव!

''माझ्या आधी आज भाऊ तुम्ही?''

''तू नियमित येतोस की नाही कचेरीत, बघायला आले. आणि तू आता न्यायाधीश झाला आहेस वाटते? या रे, आत या.'' तो शेतकर्‍यांस म्हणाला.

हेमंत तेथे बसला. ते शेतकरी आले. ते एका बाकावर बसले. त्यांनी आपली भानगड सांगितली.

''झाले सांगून?'' हेमंतने विचारले.

''झाले.''

''मी वेळ होईल तेव्हा तुमच्या गावाला येईन नि न्याय देईन. आता जा तुम्ही.'' हेमंतने सांगितले.

''हेमंत, यांच्या गावाला न्याय द्यायला मी गेलो तर नाही का चालणार? न्याय का तुलाच देता येतो? येथील काम सोडून तू जाणार वाटते? तू नको जाऊस. मीच जाईन. मी येईन रे न्याय द्यायला.'' रंगराव जरा मत्सराने म्हणाले.

''तुम्ही नका दादा. हे हेमंतच बरे.''

''मी का वाईट आहे?''

''तुम्ही चांगले आहात. परंतु एकदम रागावता. कोणाला टाकून बोलता. कोणाचा अपमान करता. लोकांना तुमचे भय वाटते. म्हणून तुम्ही नको. तसे तुम्ही चांगले आहात. परंतु तुमचे दादा लहरी काम. मनात येईल तर सारी इस्टेट देऊन टाकाल. नाही तर एक पैही तुम्ही देणार नाही. कधी एखाद्याला हृदयाशी धराल, तर त्यालाच तुम्ही पुन्हा लाथाही माराल. तुमचा दादा, भरंवसा नाही. स्पष्ट बोलतो म्हणून रागावू नका. तुम्ही मोठे आहात. येथल्या नगरपालिकेचे अध्यक्ष आहात. लक्षाधीश व्यापारी आहात. आम्ही आदबीने वागले पाहिजे. परंतु आज वेळ आली म्हणून बोललो. तुमच्याबद्दल लोकांना काय वाटते ते सांगितले.'' त्या शेतकर्‍यांतील एकजण बोलला.

« PreviousChapter ListNext »