Bookstruck

दुर्दैवी 51

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''हेमा, तुझी आई तुझ्याजवळ काही बोलली होती का?''

''कशाचे बाबतीत?''

''माझ्याविषयी तिने काही सांगितले होते?''

''पुष्कळ वर्षांपूर्वी तिचा नि तुमचा लग्नाचा संबंध होता होय ना?''

''आणखी काही तिने सांगितले होते का?''

''आणखी तसे काही विशेष तिने नव्हते सांगितले.''

''हेमा, मी तुला आज काही सांगणार आहे.''

''सांगा.''

''हेमा, तू माझी मुलगी आहेस, माझी आहेस,'' असे म्हणून त्याने तिला जवळ घेतले. क्षणभर कोणी बोलले नाही.

''हेमा, तू माझी मुलगी. तू जयंतची नाहीस. तू माझे नाव, आडनाव तुझ्या नावाशी लावीत जा. तू माझी असून माझी नव्हतीस. आता हे सारे पडदे जाऊ देत.'' असे म्हणून त्याने तिला पहिल्यापासूनची सारी हकीगत सांगितली. ती ऐकत होती. मधून तिचे डोळे भरून येत होते.

''हेमा, होशील ना तू माझी? मला जगात कोण आहे? किती तरी वर्षे मी एकटयाने काढली. दारूला मी स्पर्श केला नाही. लाखो रुपये मिळविले. मानसन्मान मिळविला. परंतु हृदयात आनंद नव्हता. माझे जीवन एकाकी होते. आणि इतक्या वर्षानंतर माया आली. परंतु तीही राहिली नाही. ती देवाकडे गेली. जणू तुझ्यासाठी ती माझ्याकडे आली. आता तू नि मी राहिलो. हेमा, खर्‍या नात्याने आपण आता राहू. तू माझी मुलगी. घेशील ना माझे नाव? 'हेमा जयंत हारीत' असे नाव आता नको लावूस. आता 'हेमा रंगराव सुनीत' असे नाव लाव. बोल ना बाळ!''

« PreviousChapter ListNext »