Bookstruck

दुर्दैवी 61

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तुझे काही चुकत असेल. पुरुष जरा लहरी असतात. तू नीट वागतेस ना?''

''त्यांना आवडेल अशा रीतीने वागण्याची मी खटपट करते. परंतु माझे सारे त्यांना वाईटच दिसते.''

''मग तू दुसरीकडे का जाऊन राहात नाहीस?''

''एखादे वेळेस मनात येते, कुठेही मोलमजुरी करून राहावे. मला कामाची हौस आहे: कंटाळा नाही. परंतु बाबांना ते आवडेल की नाही? स्वतंत्रपणे माझे राहणे त्यांना कितपत पसंत पडेल, हा प्रश्नच आहे. त्यांच्या प्रतिष्ठेला नाही तर धक्का बसायचा.''

''तू त्यांना विचारून पहा.''

''परंतु कोठे राहायचे हे निश्चित झाल्यावाचून त्यांना तरी काय विचारू?''

''तू माझ्याकडे राहशील? मला एक बाई हवी आहे. तू माझ्याकडे राहा. या गावात मी नवीनच आले आहे. एकटीच आहे. येतेस माझ्याकडे?''

''तुम्ही कोठे राहता?''

''बाजारात जरा टोकाला मी जागा घेतली आहे. तू उद्या सकाळी ये. मी बाहेर गॅलरीत उभी असेन. तुला आई नाही. मी तुझ्यावर प्रेम करीन. माझ्याकडे चार धंदे कर. भाजीपाला आणीत जा. झाडलोट कर. राहा माझ्याकडे.''

''मी विचारते बाबांना.''

''तू तिथे किती वेळ बसणार? चल आता माघारी. ऊठ, आपण बरोबर जाऊ.''

« PreviousChapter ListNext »