Bookstruck

दुर्दैवी 62

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तुम्ही इकडे एकटयाच फिरायला आला होतात?''

''एका ओळखीच्या माणसाशी बोलत आले. तो गेला. मी एकटीच फिरत आले. तुझी गाठ पडली. तुझे नाव काय?''

''माझे नाव हेमा.''

''आणि गावात ते एक नवीन पुढे आलेले व्यापारी आहेत. त्यांचे असेच काही नाव आहे.''

''हेमंत त्यांचे नाव.''

''तुझी त्यांची ओळख आहे.''

''बाबांचे त्यांच्यावर पूर्वी फार प्रेम होते. परंतु पुढे बिनसले.''

''तुझ्या वडिलांचे कोणाशीच पटत नाही वाटते?''

''कधी पटते, कधी नाही. त्यांच्या मनात त्या त्या वेळेस जी भावना येईल तिच्या आहारी जाऊन ते वागतात. क्षणांत लोभावतील, क्षणात रागावतील. मारायला अंगावर धावून येतील नि पुन्हा पश्चात्ताप होऊन रडू लागतील. त्यांचा मूळ स्वभाव काही वाईट नाही. परंतु नाना प्रकारच्या निराशा अनुभवाव्या लागल्यामुळे त्यांचा असा स्वभाव झाला असावा. मी त्यांना वाईट कसे म्हणू? किती झाले तरी ते माझे वडील आहेत. माझ्यावरही ते खूप प्रेम करीत. अलीकडेच संतापतात, चिडतात. मीही त्यांना सोडून गेले तर त्यांना अधिकच वाईट वाटेल. परंतु माझ्या दूर जाण्याने त्यांना समाधान होणार असेल, तर मी दूरही जाईन. त्यांना विचारीन.''

''हेमा, किती तू विचारी मुलगी आहेस! तुझ्या संगतीचा मला फायदा मिळेल. मीही एक होरपळलेली स्त्री आहे. ये माझ्याकडे राहायला. मोलकरीण म्हणून नाही; माझी सोबतीण म्हणून ये.''

''तुम्ही का एकटया आहात?''

''अजून तरी एकटीच आहे.''

« PreviousChapter ListNext »