Bookstruck

दुर्दैवी 69

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''हो. ते कदाचित येथल्या नगरपालिकेचे अध्यक्ष होतील.''

''सारा गाव त्यांना मान देतो. बाबांना मात्र असे काही झाले तर अपमान झाल्यासारखे वाटेल. त्या दोघांची स्पर्धा आहे.''

''हेमंत मानासाठी अधीर नाहीत असे त्यांच्या बोलण्यावरून दिसले.''

''ते स्वाभिमानी असले तरी मानासाठी हपापलेले नाहीत. ते सरळ आहेत. आत-बाहेर त्यांच्याजवळ काही एक नाही. कोणालाही आवडतील असे ते आहेत.''

''त्यांना गर्व नसावा असे दिसते.''

''ते कोणाशीही बोलतील. कोणतेही काम करतील. गरिबांची प्रतिष्ठा सांभाळतील. गडीमाणसांनाही ते कधी टाकून बोलत नाहीत.''

''त्यांची ओळख व्हावी असे वाटते.''

''ते सकाळ-संध्याकाळी फिरायला जातात.''

''सकाळीही जातात?''

''हो.''

''मी एखादे वेळेस त्यांना गाठीन. त्यांची भेट घेईन.''
ते बोलणे तेवढेच राहिले. हेमा कामाला निघून गेली. सुलभाही बाहेर पडली. ती एके ठिकाणी उभी राहिली. तेथे किती तरी गर्दी होती. काय आहे भानगड? रंगराव सन्मान्य न्यायाधीश होते. त्यांच्यासमोर एक बाईला आरोपी म्हणून उभे करण्यात आले होते. ती बाई म्हातारी होती. परंतु तिच्या जिभेत जोर होता. सारंगगावात येऊन तिने बेकायदा दारू विकली असा तिच्यावर आरोप होता. दुसरेही काही किरकोळ शिवीगाळ केल्याचे तिच्यावर आरोप होते. पोलिसांनी आरोपपत्र वाचून दाखविले. न्यायाधीश काय निकाल देतात इकडे सर्वांचे लक्ष होते.

''आजीबाई, तुम्हांला काही सांगायचे आहे? तुम्ही एवढया म्हातार्‍या झालात, तरी अजून का दारूचा धंदा करता? आता रामनाम घ्यायचे सोडून हे कशाला नसते धंदे?'' रंगराव आढयतेने म्हणाले.

« PreviousChapter ListNext »