Bookstruck

दुर्दैवी 73

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''ओळख.''

''हेमंत की काय? त्यांचीही का तुमच्याशी ओळख आहे? मला नव्हते माहीत.''

''हो, त्यांचीही ओळख झाली. हेमा, वाढ पाने. मी दोन घास तुझ्याबरोबर खाईन,''
जेवणे झाली. सुलभा जरा खाटेवर पडली. हेमा एक रुमाल तयार करीत होती.

''हेमा, तू शहाणी आहेस. बिचारी आहेस. तुला एक प्रश्न विचारू?'' सुलभा एकदम म्हणाली.

''माझ्यापेक्षा तुम्ही वयाने वडील आहात. तुम्हीच अधिक विचार करू शकाल.''

''नाही हेमा, तू अधिक गुणी आहेस. सत् काय, असत् काय हे तुला जितके कळते तितके मला नाही कळत. सांगशील का माझ्या प्रश्नाचे उत्तर?''

''सांगता आले तर सांगेन.''

''एक मुलगी आहे. तिचे एका तरुणावर प्रेम असते. परंतु काही कारणामुळे त्या तरुणीला तिच्याशी लग्न करता येत नाही. दुसर्‍या एका स्त्रीशी त्याला लग्न करावे लागते. ती मुलगी एकटीच राहते. जु्न्या प्रेमाच्या सुगंधावर राहते. परंतु त्या तरुणाची ती पत्नी मरते. तेव्हा ती मुलगी आशेने त्या तरुणाकडे येते. दोघांची गाठ पडते. तो तरुण संकटांनी गांजलेला असतो. निराश असतो. तरीही त्याच्याशी विवाह करायला ती उत्सुक असते. तोहि आनंदतो. त्याच्या निराशेत आशा येते. परंतु इतक्यात निराळीच घटना होते. त्या मुलीची एका नव्या तरुणाशी ओळख होते आणि तो तिचे जीवन क्षणांत व्यापतो. त्या मुलीच्या मनाची ओढाताण होते. त्या पहिल्या माणसाशी तिने लग्न लावावे की या दुसर्‍या? दे प्रश्नाचे उत्तर.''

''उत्तर सोपे आहे. त्या पाहिल्या माणसाशी तिने लग्न लावावे. ज्याचे प्रेम प्रथमपासून तिच्या जीवनात होते ते का एका क्षणात तिने दूर करावे? या नव्या तरुणाविषयी तिला आकर्षण वाटले. आकर्षण म्हणजे प्रेम असेच नाही. तो नवीन तरुण सुंदर असेल, संपत्तिमान असेल आणि तो पहिला मनुष्य आता तितका सुंदर नसेल. परंतु काही झाले तरी त्या पहिल्या माणसाशी लग्न लावणेच श्रेयस्कर. आणि त्या दु:खी नि निराश झालेल्या प्रियकराला पु्न्हा आशा दाखविल्यावर मागून फसविणे हे तर फारच वाईट. तुम्हांला या प्रश्नाचे उत्तर इतके कठीण का वाटावे?''

''तो पहिला मनुष्य स्वभावाने चांगला नाही असे कळल्यावरही त्याच्याशी विवाह करावा का?''

« PreviousChapter ListNext »