Bookstruck

आनंदी-आनंद 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

कावळ्याची सारी हकीकत ऐकून मी लज्जित झालो; स्तंभित झालो. “सख्या गुरो, हा आणखी तुकडा ने. तूही खा. पाणी पी. मला समाधान होईल. तू मला दिव्य विचार दिलेस. मी कृतज्ञतेने हा तुकडा देतो, घे.” मी म्हणालो. माझ्या आग्रहास्तव त्याने तुकडा खाल्ला. तो पाणी प्याला. मी त्याला वंदन केले. गेला. कावळा उडला.

माझ्या जीवनात क्रांती झाली. माझ्या मनातील पशुपक्ष्यांविषयीचे प्रेम शतगुणित झाले. मी तृणा-फुलांवर, किड्या-मुंगीवर प्रेम करू लागलो. चिमण्या-कावळ्यांवर प्रेम करू लागलो. परंतु त्याचबरोबर मानव प्राण्याचा मी तिटकारा करू लागलो. मला मानवांची घाण येई लागली. मानवाचा शब्दही ऐकू नये, असे मला वाटे. डोळ्यांवर मी फडके बांधी. कानांत बोळे घाली. मला मानवाचे दर्शन नको वाटे.

पण मी स्वत: मनुष्य होतो. माझा स्वत:चाच मला वीट येऊ लागला. मी भलतीकडेच वहावत चाललो. काय करावे, मला सुचेना. कधी डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागत. “देवा, मला मार्ग दाखव.” मी तळमळून म्हणे.

मार्ग जवळच होता. माझ्या आजूबाजूला माझे जे मानवबंधू  होते, त्यांच्यावर मी प्रेम करायला लागले पाहिजे होते. मी प्रेम करू लागलो. मला समाधान मिळू लागले. परंतु मी लहान जीव. मी किती देणार, असे मनात येई. मी शुद्ध नाही, मी अहंकारी, मत्सरी आहे, असे वाटे. तरी पण मी निराश न होण्याचे ठरवले. जे करता येईल ते करायचे. प्रत्याकाच्या हृदयात ईश्वराचा सूर आहे. त्याप्रमाणे वागण्याचे मी ठरवू लागलो. अशा रीतीने निराशा कमी होत गेली. शांती मिळू लागली. जीवनात अर्थ आला. जीवनाबद्दल गंभीरता वाटू लागली. जगण्याच आनंद वाटू लागला.

आपण जसजसे सुंदर, तसतसे सृष्टी आपल्याला सुंदर दिसू लागेल, हे तत्त्व मी ओळखले. सारे आपणावरच आहे एकंदरीत!

« PreviousChapter List