Bookstruck

मिरी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'आत्याबाई म्हणे मारील. सोडीन की काय मारल्यावाचून ? आणि हे काय ? सारे दूध सांडलेस की काय ? तुला का अवदसा आठवली आहे ? हातात जशी शक्ती नाही मेलीच्या. खाते तिन्ही त्रिकाळ, तरी मरगळल्यासारखी वागते. का ही सारी तुझी ढोंगे ? कसे ग सांडलेस दूध ? नीट धरता नव्हते येत ? चल, घरात चल. तुला चांगले चौदावे रत्‍नच हवे. चल घरात. तिकडे कोठे चाललीस ?'

'माझा तिला धक्का लागला, त्या मुलीचा दोष नाही. माझी शिडी तिला लागली. काय करील ती बिचारी ? हे घ्या दोन आणे नुकसानीचे. नका मारू तिला. कोवळी पोर.'

'तू नको मध्ये तोंड घालूस. तुझा उद्योग तू कर. म्हणे दोन आणे घ्या. आता जेवायला येतील लोक खानावळीत. त्यांना कोठले दूध वाढू ? इतक्या उशिरा आता कोठे मिळेल तरी का दूध ?'

'मिळेल, त्या पलीकडच्या रस्त्यावर एक दुकान आहे तेथे मिळेल. जा बाळ तेथे. हे चार आणे घेऊन जा.'

'म्युनिसिपालिटीचे दिवे लावणारे श्रीमंत असतात वाटते ?' आत्याबाई म्हणाली.

'पैशाने नसले तरी मनाने असतात. जा बाळ तुझे नाव काय ?'

'मिरी.'

'छान आहे नाव.'

'तुमचे नाव काय ?'

'माझे नाव कृपाराम.'

'मोठे आहे नाव, नाही ? माझे लहानसे आहे- मिरी.'

'बोलत नको बसूस. जा लवकर. दूध घेऊन ये. उशीर लावलास तर बघ.'

'जा मिरे, उद्या मी तुला एक गंमत आणून देईन हं !'

'कृपाराम खांद्यावर शिडी नि हातात कंदील घेऊन गेला. आत्याबाई घरात गेली. मिरी पुन्हा दूध आणायला गेली. दूध घेऊन ती लवकर आली. खानावळ गजबजली होती. ती लहानशी जागा सारी भरून गेली होती.

« PreviousChapter ListNext »