Bookstruck

मिरी 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तुला पिले हवीत घरात ? फेकून देते बाहेर.' असे म्हणून आत्याबाईने ते फेकले. परंतु ते कोठे पडले ? बाहेर पाण्याचे आधण होते. त्यात कपडे भिजत होते. उकळत होते पाणी ते. पिलू त्या उकळत्या पाण्यात पडले. ते केविलवाणे ओरडले. क्षणभर धडपडले. अरेरे! कोवळे पिलू. ते मेले ! मिरी दु:ख आणि संतापाने वेडी झाली.

'भाजलेस माझ्या पिलाला-' असे म्हणून तिने तेथले लाकूड उचलून त्या आत्याबाईच्या अंगावर फेकले. आत्याबाईला ते चाटून गेले. मग काय विचारता ! आत्याबाई खवळली. तिने मिरीला मार मार मारले.

'हो चालती घरातून. जा वाटेल तेथे. मसणात जा. खबरदार या घरात पाऊल ठेवशील तर ! निघतेस की नाही ? तोंड नको पुन्हा दाखवू. माजोरी कार्टी ! सहन किती करायचे ? नीघ. अशी तुला फरफटीत नेईन नाही तर.' असे ओरडत ओरडत आत्याबाईने तिला मारीत मारीत घराबाहेर घालवले.

मिरी रडत तेथे बाहेर उभी होती.

कृपाराम गेला का दिवे लावून ? नाही. हा दिवा अजून लागला नाही. विसरला की काय ? परंतु तो पाहा आला. शिडी घेऊन, हातात कंदील घेऊन तो आला. त्याने दिवा लावला. त्याचे मिरीकडे लक्ष नव्हते. तो जाणार इतक्यात त्याच्या पाठोपाठ ती धावत आली. ती ओक्साबोक्शी रडू लागली.

'काय झाले बाळ ?'

'आत्याबाईने पिलाला मारले. तिने त्याला उकळत्या पाण्यात टाकले आणि मलाही मारले नि घराबाहेर हाकलून दिले. ती आता मला घरात घेणार नाही.'

'तू काय केलेस ?'

'मला राग आला होता. मी लाकूड फेकून तिला मारले. आत्याबाईला जरासेच लागले. परंतु मला तिने किती मारले ! दुष्ट आहे आत्याबाई.'

'परंतु तू कुठे जाणार बाळ ? आत्याबाईकडेच परत जा. मी तिची समजूत घालतो. चल.

'नको. खरेच नको. ती मला मारील. आधी ती मला घरात घेणारच नाही. तिने मला फरफटत येथवर आणले.'

'तू कुठे जाशील मग रात्रीची ? तुला दुसरे कोणी नाही ?'


'कोणी नाही.'


'मग तू रात्री आता कुठे जाणार ?'


'मी तुमच्याकडे येते. मला तुमच्याकडे न्या.'


'मिरे, मी एकटा आहे. तुझे सारे कोण करील ?'

« PreviousChapter ListNext »