Bookstruck

मिरी 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळया सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते ? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती. ती का त्या सृष्टीतील सुंदर रंग बघत होती ?

बागेतील फुलांचा सुगंध येत होता. मंद मंद वारा येत होता. सुमित्राचे सुंदर केस वार्‍यावर नाचत होते. परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्हते. एकाएकी आंधळया डोळयांतून अश्रू आले. सुखाचे अश्रू की दु:खाचे ?

इतक्यात कोणाची तरी पावले वाजली. कोण आले ?

'कोण आहे ?'

'मी मिरी.'

'ये, मिरे, ये.'

'सुमित्राताई, तुम्हांला एकटे बसायला आवडते, होय ना ?'

'मिरे अशी जवळ ये. दूर नको बसूस.' सुमित्राने मिरीला प्रेमाने जवळ ओढून घेतले आणि मिरीला एकाएकी हुंदका आला.

'काय झाले, मिरे ! तू तिकडे रडत होतीस वाटते ? आज का सर्वांच्या आठवणी आल्या तुला ? एकटे का वाटते ? उगी. रडू नकोस.'

'मला मुरारीची आज आठवण येत होती. बरेच दिवसांत त्याचे पत्र नाही. एकटा परमुलुखात आहे. आज आपल्या माळयाने मला बोरे दिली. मुरारीला बोरे फार आवडतात. माझ्या हातात ती बोरे होती. आणि हृदयात मुरारीची मूर्ती उभी होती. खरेच. मुरारीशिवाय जगणे कठीण आहे. तो माझ्या जीवनात इतका खोल गेला आहे याची मला कल्पनाही नव्हती.'

'मिरे, अग, पाणी हळूहळू झिरपत झिरपत पाताळापर्यंत जाते. परंतु लक्षात येत नाही. मुरारीची चिंता नको करूस. देवाला सर्वांची चिंता आहे.'

'सुमित्राताई, माझ्या वेदना तुम्हांला कशा कळतील ? तुम्ही व्रती, वैराग्यमय जीवन कंठीत आहात. प्रेमाची तगमग तुम्हांला कशी समजेल ?'

'मिरे, मी सारे समजू शकते. सर्व स्थितीतून मी गेले आहे. मुरारीविषयी तुझा जीव कसा आसावलेला असेल ते मी जाणू शकते बाळ.'

'काय ? तुम्ही या वेदना अनुभवल्या आहेत ?'

'होय मिरे. परंतु नकोत त्या आठवणी. माझ्या हृदयातही एक प्रेममूर्ती आहे. माझ्या जीवनाचाही एक आधार होता. परंतु आमच्या दुर्दैवाने ताटातुटी झाल्या. मिरे, तू दु:ख नको करूस. मुरारीचे पत्र येईल. मिरे, तू धीर धर. आज वियोग आहे. पुढे सुख मिळेल. तुझे सारे चांगले होईल. मंगल होईल.'

'जगात केवळ सुख नाहीच एकूण. मी समजत होते की तुमच्या हृदयात केवळ शांती आहे. तुम्हांला वेदनांचा वारा लागलेला नसेल असे वाटे. परंतु तुम्हीही रडला आहात, तुम्हीही रडता ?'

« PreviousChapter ListNext »