Bookstruck

मिरी 38

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'सुमित्राताई माझा गुरू. कृपाकाका माझे गुरू. मुरारी, यशोदाआई, जमनी, सारे माझे गुरू. सुमित्राताईंची सर कोणाला येणार नाही. त्यांना बरे वाटते ना ? सांगा.'

'अजून बरे वाटत नाही. ते डॉक्टर आले. जातो मी.' असे म्हणून कृष्णचंद्र निघून गेले.'

'काय डॉक्टर, आज लवकर आलेत ?'

'शेजारच्या गावी जायचे आहे; म्हणून म्हटले, आधी सुमित्राताईंकडे जाऊन यावे. कसे आहे आता?'

'अजून बरे नाही वाटत तिला.'

'वाटेल, वाटेल. दुखणे लगेच कसे जाईल ? पाहुणा आलेला दोन दिवस तरी राहायचाच आणि एखादा पाहुणा लोचट असतो.'

दोघे वरती आले. सुमित्राताई शांतपणे पडून होत्या. डॉक्टर व वडील आल्याचे त्यांना कळले.

'काय बरे वाटते ना ?' डॉक्टरांनी मधुर वाणीने विचारले.

'डॉक्टर, तुम्ही मिरीला येथे माझ्या खोलीत यायची का बंदी केलीत ? तिचे बोलणे,  माझ्याजवळ बसणे म्हणजे माझे अमृत आहे. ते तर तुम्ही हिरावून घेतलेत. का मिरीच कंटाळली ?'

'मी नाही तिला बंदी केली !' डॉक्टर म्हणाले.

'आमची स्वयंपाकीणबाई तर असे म्हणाली.'

'काही तरी बोलल्या झाले. या जुन्या आजीबाईंच्या नाना समजुती असतात. मिरी दुर्दैवी आहे, आहे कोणा भिकारडयाची, असे त्या कधीकधी म्हणतात. परंतु त्यांनी मिरीला मज्जाव केला येथे यायला, हे नव्हते मला माहीत.'

'डॉक्टर असे बोलत आहेत तोच मिरी दाराआड येऊन चोरुन ऐकत होती. ती एकदम पुढे आली व म्हणाली,

'डॉक्टर, मी येत जाऊ ना सुमित्राताईजवळ ?'

तिच्या शब्दांत कातरता होती, दु:ख होते. तिच्या टपोर्‍या डोळयांत शतभावना होत्या.

'येत जा बेटा. तू चार दिवस आली नाहीस या खोलीत, तर यांची प्रकृती बिघडली बघ. त्या आजीबाईंना काय कळते ? तू का त्यांचे म्हणणे मनावर घ्यायचे ? वेडी कुठली ! येत जा. चार दिवस शाळेतही नको जाऊस. तुला त्या मास्तरीणबाई का शिकवणार ? तूच त्यांना शिकवशील !'

बाबा मी येत जाऊ ना ?' मिरेने कृष्णचंद्रांना विचारले.

'तुम्हीही मिरीला बंदी केली होतीत वाटते ? शाबास ! सारा वेडयांचा बाजार ! मिरीला येऊ देत जा. नाही तर माझ्या औषधांचा गुण येणार नाही.'

« PreviousChapter ListNext »