Bookstruck

मिरी 40

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाडयाने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची परीक्षाही झाली होती. शाळेतील शेवटची परीक्षा. सुमित्राताईंना ती विविध मासिके, सुंदर पुस्तके वाचून दाखवी. त्यांचा हात धरून फिरायला नेई. कधीकधी गाडीतूनही त्यांना हिंडायला नेई. मिरी बैलांना हाकी. घरचीच गाडी होती. बैलांना मिरी भीत नसे. ती त्यांना सोडी, जोडी, बांधी. मिरीला सारे येई. जणू शेतकर्‍याची मुलगी वाटे ती. एकदा बैलगाडीतून ती अशीच सुमित्राताईंना घेऊन गेली. बरीच दूर गेली होती. बैलांच्या गळयांतील घंटा वाजत होत्या, वारा सुरेख येत होता. मिरी गाणे म्हणत होती. तो रस्त्यावर तेथे कोणी तरी बसलेले दिसले. कोण होते ते ? एक लठ्ठ अशी बाई होती. मिरीने तिला ओळखले. रस्त्यात घसरून पडलेली तीच ती बाई. मुरारीने जिला हात धरून पोचवले तीच ती बाई. ती इकडे कोठे ?

'ए पोरी, परत जाताना मला ने गाडीतून. मी थकले आहे. त्या फाटयावरच त्या गाडीवाल्याने मला उतरवले. नेशील का ?

'हो नेईन.' मिरी म्हणाली.

'मिरे, आता माघारीच फिरव गाडी.' सुमित्राताई म्हणाल्या. त्या बाई गाडीत बसल्या. सुमित्राताई अंग चोरून बसल्या. जागा व्हायला हवी ना ?'

'तुम्ही इकडे कुठे ?' मिरीने विचारले.

'तू मला ओळखतेस की काय ?'

'हो, तुम्ही रस्त्यात एकदा पडल्यात. त्या एका तरुण मुलाने तुम्हांला हात धरून नेले. तुम्हीच ना त्या ?'

'होय. तो मुलगा फार चांगला निघाला. एका व्यापार्‍याने त्याला आफ्रिकेत पाठवले. मी माझ्या मृत्युपत्रात त्या मुलाच्या नावाने काही ठेवणार आहे. मला दुसरे आहे कोण ? एकटी मी. सारे सार्वजनिक कामाला देऊन टाकणार आहे. परंतु त्या मुलाला मी विसरणार नाही.'

'आणि मला नाही का काही देणार ? मृत्युपत्र करताना माझीही आठवण ठेवा.'

'चावट कुठली ! तू उद्या लग्न करशील, श्रीमंत नवरा मिळेल. तुला काय तोटा ? तू सुंदर आहेस. श्रीमंताची आहेस.'

'आणि व्यापार्‍याची ज्याच्यावर कृपा तो मुरारी का भिकारी आहे ? तुमच्या पैशाची त्याला जरूरी आहे वाटते ?'

'मिरे, किती बोलशील ?'

'बोलू द्या हो. हे काय ? तुम्हांला दिसत नाही वाटते ? तुम्हीच कृष्णचंद्रांच्या कन्या की काय ? इकडे कुठे ?'

'हवापालट करण्यासाठी येथे हल्ली राहते. आणि तुम्ही या खेडेगावात कोठे ?'

'मी येथे लहानसे घर केले आहे. हल्ली या खेडयातच राहते. शेवटचे दिवस येथे समाधानात दवडते. मधून सभा वगैरे असली तर शहरात जाते. आज बालकदिन होता म्हणून गेले होते. मुलांचे मला फार वेड.'

'तुम्ही का एकटया आहात ?'

'मी लग्न केले नाही. नको संसाराची यातायात, असे मनात ठरवले. पण घरात शून्य वाटे. मी मोठमोठया बाहुल्या घरात ठेवी. त्यांनाच कपडे शिवावे, त्यांना सजवावे. एकदा एक अनाथ मुलगा मी पाळला. परंतु तो वारला. त्याच्यावर मी किती प्रेम करीत असे. मी माता नसले तरी मातृप्रेम त्याला देत असे.'

« PreviousChapter ListNext »