Bookstruck

मिरी 45

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कृष्णचंद्र रागाने उठून घरात गेले. सुमित्रा व मिरी, दोघीजणी तेथे होत्या.

'सुमित्राताई, तुम्ही लंकेची सफर करून या. मला प्रवासपत्रे पाठवीत जा. पाठवाल ना ?'

'कोणी लिहायला भेटले तर. बाबा तर लिहिणार नाहीत. ते कोणाला तरी बरोबर घेतीलच. त्यांच्याकडून लिहवीत जाईन पत्रे. परंतु मी परस्वाधीन आहे हे तू जाणतेसच. मिरे, बाबा रागावले म्हणून वाईट नको वाटून घेऊस. उद्या सकाळी तू जा हो बेटा.'

मिरीने सुमित्राताईंच्या गळयाला मिठी मारली. तिला हुंदका आला. सुमित्राताई तिला शांत करीत होत्या.

'उगी, रडू नकोस.'

'सुमित्राताई, मी दुर्दैवीच आहे. माझ्या आईबापांनी जन्मत:च माझ्या गळयाला नख का लावले नाही ? माझ्यामुळे कुणालाच सुख नाही. तुम्हीही मला कृतघ्न म्हणाल का ?'

'मी का वेडी आहे असे म्हणायला ? मनात वेडेवाकडे आणू नकोस. तू कर्तव्याच्या प्रकाशात पावले टाकीत जात आहेस. समाधानाने राहा. अनेकांचे अनेक स्वभाव. सर्वांनाच आपल्या वर्तनामुळे बरे वाटेल असे नाही. जगात एकाचे सुख ते पुष्कळवेळा दुसर्‍याचे दु:ख ठरते. आपले वर्तन प्रभूला आवडेल की नाही एवढेच बघावे. हीच एक कसोटी आपल्या वर्तनाला लावावी नि धैर्याने या संसारात, या बहुरंगी दुनियेत वागावे.'

'तुम्ही आपल्या प्रकृतीला जपा.'
'मी जपतच आहे. आणि तूही स्वत:ची हयगय करीत जाऊ नकोस. समजलीस ना ?'

शेवटी मिरीने सुमित्राबाईंना आत नेऊन अंथरुणावर निजविले. त्यांच्याजवळ थोडा वेळ बसून तीही आपल्या अंथरुणावर पडली.

« PreviousChapter ListNext »